नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर मुंबई उच्च न्यायालयाने सिडकोला फटकारल्यानंतर सिडकोने निष्कासन कारवाईचा वेग वाढविला आहे. घणसोली सेक्टर १६ मधील पाच मजली गणेश अपार्टमेंटवर सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. घणसोली बंदची हाक देत रहिवाशांनी सिडकोच्या कारवाईविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला. आयुष्याची पुंजी खर्चून घेतलेली घरे गेली, आता संसार कुठे थाटायचा? अनधिकृत बांधकामे उभी राहत असताना संबंधित यंत्रणा काय करीत होत्या, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
घणसोली सर्वे क्रमांक ११६ येथील तळमजला अधिक पाच मजली गणेश अपार्टमेंटवर २३ नोव्हेंबर रोजी सिडकोने निष्कासन कारवाई केली. या कारवाईत इमारतीचे दहा स्लॅब, जिना, अंतर्गत भिंती, स्वयंपाकघरातील ओटे आणि स्नानगृहांचे बांधकाम पाडण्यात आले. तसेच इमारतीच्या समोरील दोन्ही बाजूंच्या २५ भिंतीही निष्कासित करण्यात आल्या.
देवस्थान संस्था, घणसोली (गावकी) यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कारवाई झालेल्या इमारतीजवळ नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. जुन्या निवासी इमारतींचे संरक्षण करावे, निष्कासन कारवाई थांबवावी आणि बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचा विचार करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
घणसोलीत ६२ कारवाया
नवी मुंबईतील कथित अनधिकृत बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील सुमारे ४,९४६ कथित अनधिकृत इमारतींच्या प्रकरणात महापालिकेने सिडको हे नियोजन प्राधिकरण असल्याने कारवाईची जबाबदारी सिडकोची असल्याची भूमिका मांडली आहे. १६ जून ते १८ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या १६१ निष्कासन कारवायांपैकी सर्वाधिक ६२ कारवाया घणसोलीत झाल्या. घणसोलीतील सिडकोच्या जमिनीवरील ९२६ बांधकामांची नोंदही न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
दस्तनोंदणी घोटाळ्यात महसूल बुडाला
घणसोलीतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न केवळ इमारती उभारण्यापुरता मर्यादित नसून, सदनिकांच्या नियमबाह्य दस्तनोंदणीचा गंभीर प्रकारही समोर आला आहे. सह दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक आठमधील तत्कालीन अधिकारी राजकुमार दहिफळे, दस्तनोंदणी एजंट योगेश चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी १८ ते २८ जूनदरम्यान अवघ्या दहा दिवसांत ८७२ घरांची दस्तनोंदणी केल्याचे चौकशीत उघड झाले.
त्यापैकी ४३९ दस्त घणसोलीतील आहेत. पुढील चौकशीत दलालांच्या माध्यमातून सुमारे सहा हजार प्रकरणांमध्ये नियमबाह्य दस्तनोंदणी झाल्याचे आणि शासनाचा सुमारे १३ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे समोर आले.