Gautami Patil
बदलापूर: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या महासंग्रामासाठी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. युती आणि जागावाटप यावरून पक्षांच्या बैठका सुरू असतानाच अनेक इच्छुकांनी मात्र नेत्यांच्या दाराचे उंबरे झिजवले आहेत. राज्यातील या राजकीय रणधुमाळीवर नृत्यांगना गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवात गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना गौतमीला कोणत्या पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी ऑफर आहे का? असा प्रश्न विचारला असता, ती म्हणाली "अरे बाप रे... मला राजकारणात इंटरेस्ट नाही. मी कधीच राजकारणात जाणार नाही. मी अभिनय आणि कला सादर करत राहील."
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बहुरंगी लढती रंगणार असून भाजप-शिंदे गटाची महायुती विरुद्ध उद्धव ठाकरे गट, मनसे युती यांच्यात तगडी टक्कर होईल, तर काँग्रेस आणि अजित पवार गट हे स्वबळावर लढणार असून हे पक्ष या लढाईत रंगत आणणार आहेत.
उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली असून त्यांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. मराठीबहुल भागांतील वॉर्डाबाबत चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईसाठी वचननामा असेल. मराठीच्या मुद्द्याबरोबर मुंबईचा विकास यावर भर असेल.