पुढारी ऑनलाईन डेस्क: काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नाची मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यानंतर आता उद्योगपती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाच्या बातम्यांची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. हिरे व्यापारी जैमिन शहा यांची मुलगी दिवा हिच्याशी जीतचे लग्न ७ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे. २१ जानेवारी रोजी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर स्वतः अदानी यांनी ही माहिती दिली होती.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, जीतचे लग्न अगदी साधेपणाने होईल. "आम्ही सामान्य लोकांसारखे आहोत. जीत येथे गंगा मातेचे आशीर्वाद घेण्यासाठी आला होता. त्यांचे लग्न साध्या आणि पारंपरिक पद्धतीने होईल. जीतचे लग्न "सेलिब्रिटींचा महाकुंभ" असेल का ? असे त्यांना विचारले असता, अदानी म्हणाले, निश्चितच नाही.
२७ वर्षीय जीत अदानीच्या लग्नाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अनेक माध्यमांचा असा दावा आहे की, टेलर स्विफ्टसह अनेक सेलिब्रिटी या लग्नाला उपस्थित राहतील. तर उद्योगपती एलोन मस्क, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, डॅनियल क्रेग, जस्टिन बीबर, कान्ये वेस्ट, कार्दशियन बहिणी, राफेल नदाल, दिलजीत दोसांझ, सुंदर पिचाई, सत्या नडेला, बिली आयलीश, कोल्डप्ले आणि अगदी किंग चार्ल्स आणि पोप हे सुद्धा लग्नाला उपस्थित राहतील, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
लग्न ७ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये होईल आणि लग्नापूर्वीचे विधी ५ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. जीत आणि दिवा यांचे मार्च २०२३ मध्ये साखरपुडा झाला आहे. त्यांच्या लग्नाला ३०० पेक्षा जास्त पाहुणे उपस्थित नसतील. परंतु, त्यांची संख्या अधिकृतपणे निश्चित केलेली नाही, असे सांगितले जाते.
जीत याने पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या अभियांत्रिकी आणि उपयोजित विज्ञान शाखेतून पदवी संपादन केली आहे. तो अदानी एअरपोर्ट्समध्ये संचालक आहे. ही अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असून भारतातील सहा विमानतळांचे व्यवस्थापन करते. त्याच्या एक्स अकाउंटवरील पोस्टनुसार, जीत अदानी पायलटचे प्रशिक्षण घेत आहे. जीत २०१९ मध्ये अदानी ग्रुपमध्ये सामील झाला. ग्रुप सीएफओच्या कार्यालयातून त्यांने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली आहे. ते स्ट्रॅटेजिक फायनान्स, कॅपिटल मार्केट आणि रिस्क अँड गव्हर्नन्स पॉलिसीचा कारभार पाहतात. जीत अदानी यांचे मोठे भाऊ करण अदानी पोर्ट्सचे प्रमुख आहेत आणि त्यांचे लग्न परिधी अदानीशी झाले आहे.
दिवा जैमिन शाह ही व्यवसायातील एक मोठे नाव असलेल्या हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी आहे. हे कुटुंब सार्वजनिक प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते.