Gargai water supply project approval Pudhari
मुंबई

Gargai water supply project approval: गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प अखेर साकारणार! स्थायी समितीची मंजुरी

ठाकरे सेनेसह काँग्रेसचा विरोध

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाच्या प्रस्तावाला अखेर बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गट व काँग्रेसने पर्यावरणाच्या ऱ्हास होत असल्याचे सांगत प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. मात्र स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी ही मागणी फेटाळून लावत प्रस्ताव बहुमताने मंजूर केला.

चितळे कमिटीच्या शिफारसीनुसार, पालिकेने 2011 पूर्वी वैतरणा नदीवर गारगाई, पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणी व पालिका प्रशासनाची उदासीनता यामुळे यापैकी एकही प्रकल्प सत्यात उतरला नाही. अखेर राज्यातील सत्ताधारी भाजपा-शिवसेना महायुतीच्या निर्देशानुसार महापालिकेने गारगाई प्रकल्पचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला.

तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. पण या प्रकल्पासाठी करण्यात येणारा खर्च जास्त असून प्रकल्प साकारताना पर्यावरणाचीही काळजी घेण्यात आली नसल्याचा आक्षेप शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेसने घेतला. प्रस्ताव दप्तरी दाखल करून नव्याने सादर करावा, अशी मागणी करण्यात आली. मात्र, मुंबईतील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक असलेले सभागृह नेते गणेश खणकर यांनी स्पष्ट केले.

अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दप्तरी टाकण्याची सूचना मतास टाकली असता ती बहुमताच्या जोरावर फेटाळून लावली. त्यानंतर मूळ प्रस्ताव मतास टाकला असता तो बहुमताने मंजूर करण्यात आला.

त्यामुळे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पाची पायाभरणी मे महिन्यापूर्वी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये गारगाई नदीवर 69 मीटर उंचीचे व 979.4 मीटर लांबीचे धरण बांधण्यात येणार आहे. या धरणातील पाणी मुंबईत आणण्यासाठी 1.6 किमी लांबीचा बोगदा बांधण्यासह अन्य पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार आहेत.

प्रकल्प पालघर जिल्ह्यात

गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका ओघदे गावानजीक विकसित करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पर्यायी वनीकरणासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ सुमारे सात 670 हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील ओगदे व खोदाडे गावे पुर्णपणे बाधित होणार आहेत. तर तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशत: बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन आजूबाजूच्या परिसरात करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT