गरब्याच्या ठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका बंधनकारक ! pudhari photo
मुंबई

Navratri festival medical rules : गरब्याच्या ठिकाणी कार्डियाक रुग्णवाहिका बंधनकारक !

हमीपत्र मुंबई महापालिका नवरात्रोत्सव मंडळाकडून घेणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईकरांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. गरबा खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाय म्हणून गरब्याच्या ठिकाणी डॉक्टरांसह कार्डियाक रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे हमीपत्र मुंबई महापालिका नवरात्रोत्सव मंडळाकडून घेणार आहे.

घटस्थापना 22 सप्टेंबरला होणार असल्यामुळे दसर्‍याच्या आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे 1 ऑक्टोबरपर्यंत मुंबईत विविध संस्था, राजकीय पक्ष, मंडळे यांच्याकडून गरब्याचे आयोजन करण्यात येणार आहे. रास दांडिया खेळत असताना अनेक जण भान विसरून नाचण्यामध्ये गुंग होतात. अशावेळी हृदयावर ताण येऊन, हृदयविकाराने मृत्यू होण्याची भीती असते.

अशा घटना मागील दोन वर्षांत ठिकठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून तातडीने उपचार मिळावा, यासाठी प्राथमिक वैद्यकीय सेवासुविधांसह डॉक्टर अन्य वैद्यकीय कर्मचारी व ऑक्सिजन सेवा असलेली कार्डियाक रुग्णवाहिका ठेवणे मंडळांना सक्तीचे करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी परवानगी घेत असताना रुग्णवाहिकेचे हमीपत्रही घेण्यात येणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

हॉस्पिटललाही सतर्क राहण्याच्या सूचना

हॉस्पिटल प्रशासनालाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एखादा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभागात बेड आरक्षित ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

परवानगीसाठी एकखिडकी योजना

मुंबई शहर व उपनगरांत 1 हजार 250 पेक्षा जास्त नवरात्रोत्सव मंडळे आहेत. त्याशिवाय काही इमारती व खासगी संस्थांमार्फत लहान-मोठ्या गरब्यांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे नवरात्रोत्सवासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या एकखिडकी योजनेमार्फत पालिकेकडून दिल्या जातात. यावर्षी परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT