मुंबई: आगामी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. गणेश चतुर्थीपूर्वी तीन- चार दिवसांचे तिकीट मिळावे म्हणून कोकणवासियांमध्ये प्रचंड लगबग आहे.
मात्र, कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांची ११ सप्टेंबरची प्रतीक्षा यादीची मर्यादा सोमवारी पार होऊन आरक्षण 'रिग्रेट' झाले आहे. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गावरील कोकणकन्या, दादर सावंतवाडी, मंगळुरू एक्स्प्रेससह प्रमुख गाड्यांचे आरक्षित तिकीट मिळणे कठीण झाल्याने चाकरमान्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
कोकणातील गणेशोत्सव सर्वात मोठा सण मानला जातो. यावर्षी १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यासाठी कोकणवासियांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. गावी जाण्यासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तिकिटे आरक्षित केली जात आहेत.
परंतु, कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादी आतापासूनच मर्यादा पार करत असल्याने 'रिग्रेट'चा संदेश दाखवला जात आहे. गेल्या १० जुलै रोजीपासून ८ सप्टेंबर रोजीचे तिकीट सुरू झाले आहे.
त्यामुळे रेल्वेची चर्चगेट, दादर, वांद्रे, बोरिवली, कुर्ला, मुलुंड आणि ठाणे अशा आरक्षण केंद्रांवर चाकरमान्यांनी गर्दी केली आहे. तसेच घरबसल्या तिकीट काढणे शक्य झाल्याने आयआरसीटीसी आणि खासगी संकेतस्थळावरून तिकिटांसाठी प्रचंड मागणी आहे.
त्यामुळे सोमवारी कोकणात जाणाऱ्या ११ सप्टेंबरसाठीच्या सर्व गाड्यांची तिकिटे काही मिनिटांत आरक्षित झाली आहेत. संकेतस्थळावरून तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास 'रिग्रेट' चा संदेश दाखवून तिकीट नाकारले जात आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
गेल्या वर्षीही कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादी अशाच पद्धतीने 'रिग्रेट' झाल्याने कोकणवासियांकडून संताप व्यक्त केला गेला होता. त्यावर रेल्वेकडून बोगस तिकीट आणि ते मिळवून देणाऱ्या एजंट, संकेतस्थळाची चौकशी करून कारवाई हाती घेतली होती. यावर्षीही त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.