Ganpati Jewellery Pudhari
मुंबई

Ganpati Jewellery: नवी मुंबईत बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी; सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडवलेले दागिने वापरण्यावर भर

सोने-चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याने व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: गणेशोत्सवासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेश मूर्तींचे सौंदर्य खुलवण्यासाठी दागिन्यांना विशेष महत्त्व आहे.

घरातला बाप्पा असो वा मंडळातला, प्रत्येक गणेशभक्तांना मूर्ती सजवण्याची हौस असते आणि तीच हौस पूर्ण करण्यासाठी हल्ली बाजारात विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याने व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत सुरू आहे.

लाडक्या बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पहायला मिळत आहे. भाविकांना मनाजोगे दागिने उपलब्ध व्हावेत याकरिता सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे.

दिवसेंदिवस सोने-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दागिने खरेदीचा जोर तसा कमी झाल्याने बाप्पासाठी सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडवलेले दागिने, हुबेहूब सोन्यासारखे दिसणाऱ्या दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. बाप्पांची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यास मंडळांचे अधिक प्राधान्य दिसून येत आहे.

चांदीचा पत्रा तयार करून मूर्तीच्या मापानुसार संबंधित दागिन्याचे कच्चे नक्षीकाम करण्यात येते. पेन्सिलने तयार केलेले हे नक्षीकाम चांदीच्या पत्र्यावर चिटकवले जाते. लाख, खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने अंतिम नक्षीकाम तयार केले जात असल्याची माहिती व्यापारी दिनेश मेहता यांनी दिली.

मूर्ती सजवण्यासाठी मोत्यांची माळ, डायमंड ज्वेलरी तसेच इकोफ्रेंडली बाप्पासाठी कागदापासून तयार केलेले दागिने, फुलांपासून तयार केलेल्या माळांचा वापर केला जात आहे.

दागिन्यांचे प्रकार

विविध ज्वेलर्स ब्रॅण्डने बाप्पाचे उपरणे, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळं, उंदीर आदी प्रकारचे दागिने आपल्याला पाहायला मिळतील.

मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगण, कुंडल, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचं पान, मोदकाची चळ, जाणवं, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप आदींना वाढती मागणी आहे.

सोन्यांचे पाणी वापरणाऱ्या वस्तूंसाठी एक ग्रॅमची ४०० रुपये किंमत आहे. वस्तुच्या आकारानुसार त्यांची साईज ठरते व त्यानुसार दर ठरतात. चांदी व सोन्यांचा मुलामा दिलेल्या वस्तूंना चांगली मागणी आहे. आता त्यामध्ये विविध प्रकारही येऊ लागले आहे.
-मोतीसिंह, व्यापारी
बाप्पाला सोन्याच्या तसेच चांदीच्या वस्तुंनी सजवताना जरा वेगळेपण वाटते. खोटी विभुषणे घालण्यापेक्षा सोन्याची विभुषणे घालताना वेगळा आनंद वाटतो. एकदा सोन्याचा मुलामा दिलेली दागिने वापरल्यानंतरही ते सांभाळून ठेवण्यात येतात. दरवर्षी एक नवीन दागिना घेण्यात येतो.
-सुनंदा मोकाशी, नागरिक
आम्ही पुर्वाजापांसून गणशोत्सव साजरा करत आहे. आमच्या समाजात दागिन्यांची आवडही मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे महिला जास्त दागिने घालतात. मग बाप्पाला नकली विभुषणे घालण्यापेक्ष सोन्याची दागिने घेण्यात येतात.
-रमेश पाटील, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT