ठळक मुद्दे
गणेशोत्सवासाठी आठवडाभरात ७०० ट्रक म्हणजे सुमारे सव्वातीन कोटी नारळांची विक्री
पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, कोकणासह राज्यभरात सहा ते सात कोटींच्यावर नारळविक्री
तामिळनाडू राज्यातून सर्वाधिक ८० टक्के नारळाची आवक
नवी मुंबईः राजेंद्र पाटील
मुंबई एपीएमसीतून गणेशोत्सवासाठी आठवडाभरात ७०० ट्रक म्हणजे सुमारे सव्वातीन कोटी नारळांची विक्री होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० लाख नारळाच्या विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये नवसासाठी लागणाऱ्या लहान नारळाला मोठी मागणी आहे. पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, कोकणासह राज्यभरात सहा ते सात कोटींच्यावर नारळाची विक्री होण्याची शक्यता आहे. यावर्षी नारळाचा दर गेल्या वर्षीपेक्षा दोन ते अडीच रुपयांनी वाढल्याची माहिती एपीएमसीतील घाऊक नारळ व्यापारी धनंजय काळे यांनी पुढारीशी बोलताना दिली.
तामिळनाडू राज्यात सर्वाधिक नारळाचे उत्पादन घेतले जाते. शहाळ्यांच्या खपात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने आणि नारळाची परदेशात होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याने त्याचा परिणाम आवकवर झाला आहे. बुधवारी २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून एपीएमसीत नारळ खरेदीला वेग आला आहे. कोकणात तीन दिवसात २५० गाडी नारळ मागणीनुसार एपीएमसीतून पाठविण्यात आल्या. केरळमधून नारळाची आवक यावर्षी नसून आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून ८ ते १० टक्के तर तामिळनाडू राज्यातून सर्वाधिक ८० टक्के नारळाची आवक मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये होते. तर काही उपनगरात आणि जिल्ह्यांत थेट या राज्यातून नारळाचे ट्रक विक्रेते मागवतात.
एरवी एपीएमसीतून मुंबईसह उपनगरात ४० ते ४५ ट्रक नारळ पाठविला जातो. मात्र गणेशोत्सवाच्या काळात नारळाला वाढती मागणी असल्याने आवकमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. एका ट्रकमध्ये सुमारे २३ हजार म्हणजे ८ हजार गोणी नारळाची आवक होते. १६ टन नारळाच्या गाडीचे भाडे ७३ ते ७५ हजार आहे. अशी माहिती घाऊक व्यापारी धनंजय काळे यांनी दिली. नारळ विक्रीत नवसाचे, मोदकासाठी, घरगुती वापरण्याच्या नारळांचा समावेश आहे.
तामिळनाडूमधून पेराऊरनी, पटूकोटीई, कोलाची, ऐलूर, पलन्नी येथुन मोठ्या प्रमाणावर नारळाची आवक सुरु आहे. तर केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नरसापूर व पालकोल येथून यावर्षी आवक नाही. यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत नारळाच्या किमतीत दोन ते अडीच रुपयांनी वाढ होऊन, लहान नारळ किरकोळ बाज-ारात २७ ते ४० रुपये आणि मध्यम नारळ ५० ते ५५ रुपयांना विकला जात आहे. ठोक खरेदीदाराला २३ ते ४० रुपये नगाप्रमाणे घाऊक बाजारातून नारळांची विक्री केली जाते.
वर्ष आणि रोजची विक्री
2020 : 6 लाख
2021 : 9 ते 10 लाख
2022 : 15 ते 20 लाख
2023 : 20 ते 25 लाख
2024 : 0 ते 25 लाख
2025 : 30 ते 32 लाख