ठळक मुद्दे
गणेश उत्सव साहित्य घेण्यासाठी गणेश भक्तांची रेलचेल
दादर, लालबाग बाजारात तूफान गर्दी
रविवारी दिवसभर दादर, लालबाग, काळबादेवी परिसरातील लोहार चाळ, क्रॉफर्ड मार्केट गर्दीने गजबजले
मुंबई : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस दिवस उरले आहेत. त्यामुळे मुंबईतील बाजारपेठांत गणेश सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी अलोट गर्दी केली. रविवार (दि.24) सुट्टीचा दिवस असल्याने अनेक कुटुंबांनी साहित्य खरेदी करण्यासाठी अख्खा दिवस खर्ची घातला. रविवारी दिवसभर दादर, लालबाग, काळबादेवी परिसरातील लोहार चाळ, क्रॉफर्ड मार्केट परिसरासह उपनगरातील बाजारपेठेत हेच चित्र होते.
आनंद व उत्सवाचा सण गणेश चतुर्थी येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. यावर्षी घरगुती गणेशोत्सव सात दिवस आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी सलग दोन दिवस शनिवारी व रविवारी मुंबईतील विविध बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती साहित्य घेण्यासाठी घालवले, तर मुंबईतून आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सजावटीचे साहित्य, नैवेद्याचे साखर फुटाणे, बत्ताशा आदी खरेदीसाठी दादर, लालबाग परिसरासह अंधेरी, मालाड, बोरिवली या उपनगरातील बाजारपेठांत प्रचंड गर्दी केली.
कंठी, मखर, लटकन, रगबरगा प्लास्टिक फुले, विविध आकर्षक फुलांची तोरणे विविधरंगी कापड अशा सजावटी साहित्यासह विद्युत माळा, पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते. याचबरोबर फळांनाही मागणी होती. फळाचे दरही वधारले होते. गणपतीसाठी लागणारी पाच फळे सरासरी ६० ते ७० रुपये असा त्याचा दर होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत मुंबईतील बाजारपेठांत खरेदीसाठी झुंबड सुरूच होती.
खरेदीमुळे छोट्या गल्ल्यांमध्ये बोट शिरायलाही जागा नव्हती. फेरीवाल्यांनी आज कधी नव्हे इतकी गर्दी केली होती. बाप्पाच्या खरेदीसाठी अख्खे कुटुंबच रस्त्यावर उतरले होते. शहरातील सर्व हॉटेल्स, बस, रेल्वे फुल्ल झाल्या होत्या. फळे, फुले, मखर, मोदक, लाडू, चिवडा अशी सर्वच दुकाने हाउसफुल्ल होती.
एकीकडे शहरात वाहनांची गर्दी झाली होती, तर कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्याही हाऊसफुल झाल्या होत्या. रेल्वेने यंदा ३८० हून अधिक विशेष गाड्या सोडल्या. भाजपनेही शनिवार आणि रविवारी तब्बल ३५० गाड्या सोडल्या. मंत्री नितेश राणे यांनी दोन मोदी स्पेशल ट्रेन सोडल्या. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक पुरते कोलमडले. आठ तासांच्या ठिकाणी बारा तास लागत होते. त्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या भागांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सर्वत्र कमालीची गर्दी असतानाही गणेश भक्तांमध्ये आणि एकूणच वातावरणात प्रचंड उत्साह होता.