मुंबई : घरगुती आणि सात दिवसांच्या गणरायांच्या विसर्जनानंतर मुंबईकर सार्वजनिक मंडळांमधील गणेशमूर्ती पाहण्यासाठी घराबाहेर पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे / कल्याण या स्थानकांदरम्यान रात्रीच्या वेळेत २२ जादा तर पश्चिम रेल्वेवरही १२ जादा लोकल सोडण्यात येणार आहेत.
सीएसएमटी-कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून रात्री १.४० वाजता सुटेल आणि कल्याणला रात्री ३ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. सीएसएमटी- ठाणे जादा लोकल सीएसएमटीहून रात्री २.३० वाजता सुटेल आणि ३.३० वाजता ठाण्याला पोहोचेल. तर, सीएसएमटी कल्याण विशेष लोकल सीएसएमटीहून मध्यरात्र उलटून ३.२५ वाजता सुटून कल्याणमध्ये पहाटे ४.५५ ला पोहोचेल. कल्याण-सीएसएमटी विशेष लोकल कल्याणहून रात्री १२.५ ला निघून रात्री १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ठाणे - सीएसएमटी जादा गाडी ठाण्याहून रात्री १ वाजता निघून आणि रात्री २ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. तर दुसरी ठाणे-सीएसएमटी विशेष लोकल ठाण्याहून रात्री २ वाजता सुटून रात्री ३ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री पश्चिम रेल्वेवरून १२ विशेष लोकल चालवण्यात येतील. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी पहाटेपर्यंत या लोकल उपलब्ध असतील. चचर्गेटहन विरारसाठी रात्री १.१५, १.४५, २.१५, २.४५, ३.१५ आणि ३.४५ वाजता लोकल सुटतील. तर, विरारहून चर्चगेटसाठी रात्री १२.१५, १२.३०, १.००, १.३०, २.०० आणि रात्री ३.०० वाजता लोकल सुटेल.
अनंत चतुर्दशीच्या रात्री हार्बर रेल्वेकडून ४ विशेष लोकल सुटतील. ज्यामध्ये सीएसएमटीवरून रात्री १.३० वाजता विशेष लोकल सुटेल आणि पनवेलला ही लोकल २.५० वाजता पोहोचेल. सीएसएमटीहून रात्री २.४५ वाजता सुटणारी दुसरी लोकल पनवेलला पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. तर पनवेलहून रात्री १ वाजता सुटणारी विशेष लोकल सुटेल रात्री २.२० वाजता सीएसएमटीला पोहोचेल आणि पनवेलवरून रात्री १.४५ वाजता सुटणारी लोकल सीएसएमटीला रात्री ३.०५ वाजता पोहोचेल.