Mumbai Maratha Morcha Impact On Ganpati Festival South Mumbai
मुंबई : अनुपमा गुंडे
वाहत्या मुंबईला खिंडीत पकडू पाहणाऱ्या मराठा आंदोलकांनी रस्तेच रोखल्याने विशेषतः दक्षिण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दरवर्षी येणाऱ्या भाविकांचा ओघ गेल्या चार दिवसांत आटला. शिवाय मंडळांच्या वतीने गणेशोत्सव काळात हमखास आयोजित होणाऱ्या आरोग्य शिबिरांचे आयोजनही धोक्यात आले.
गणेश मंडपात आंदोलकांची गर्दी जास्त वाटली तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे तसेच मंडळाचे किमान २० कार्यकर्ते आणि पदाधिकारी तैनात करण्याचे आदेशही मंडळांना पोलिसांनी दिले आहेत.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने गेल्या ४ दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांतील मुंबईकरांचे जनजीवन वाहतूक कोंडीने विस्कळीत केले आहे. या वाहतूक कोंडीचा फटका मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे आणि नवी मुंबईला बसतो आहे. पडत्या पावसामुळे मुंबईत सोय न झालेल्या आंदोलनकर्त्यांनी नवी मुंबईची वाट धरली, तर काहींनी दक्षिण मुंबईत जमेल तिथे पथारी पसरली. गावशिवारातून येणाऱ्या भाजी भाकरीवर ताव मारत हे आंदोलनकर्ते मुंबई दर्शनही करत असल्याचे चित्र आहे. आंदोलकांची ठिकठिकाणी दिसणारी गर्दी पाहून गणेशोत्सवात मुंबईतील मोठ्या आणि मानाच्या मंडळांचे देखावे पाहण्यासाठी हमखास बाहेर पडणारा मुंबईकर आणि ठाणेकर गेल्या चार दिवसांत बाहेरच पडला नाही.
फोर्टमध्ये ३० ते ३५, कुलाब्यात २० -२५, गिरगावात ४८, खेतवाडीत ३० ते ३५, ऑपेरा हाऊस ते लोअर परेल २० २५ मोठी सार्वजनिक मंडळे आहेत. बहुतांशी मंडळे काही ३०-४० वर्षांची तर काही शताब्दीच्या उंबरठ्यावर आहेत, यातील अनेक मंडळांच्या गणेशमूर्ती आणि देखावे पाहणे ही मुंबईकरांसाठी एरवी पर्वणी असते. मुंबईतून बाहेर गेलेला मध्यम वर्ग आजही आठवणीने हे देखावे पाहण्यासाठी लोकलने मुंबईची वाट धरतो आणि रात्र जागवत गणपती दर्शन करतो. तरुणाईमध्येही आजकाल ही क्रेझ झाली आहे. रात्रभर दक्षिण मुंबईतील गणेश ोत्सव पाहून सकाळी लालबागच्या राजाची
गर्दी कमी झाली की त्याचे दर्शन घेऊन घरी परतायचे असा शिरस्ता आहे. मुंबईकरांच्या या सगळ्या उत्साहावर यंदा चार दिवसांच्या आंदोलनातील गर्दीमुळे पाणी फिरले. आता गणेशोत्सवाचे जेमतेम पाच दिवस उरले आहेत. मंगळवारचा दिवस न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा आदोलकांना मुंबईबाहेर काढण्यात आणि पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानापुरते मर्यादित ठेवण्यात जाईल. संध्याकाळी मुंबईने मोकळा श्वास घेतला आणि मुंबईकर बाहेर पडले तर देखाव्यांसमोर गर्दी दिसेल. अन्यथा यंदाचा गणेशोत्सव चारच दिवसांचा होता असे समजून या मर्यादित दिवसांत जमतील तितके देखावे मुंबईकर बघतील असे चित्र आहे.
आमचे गणेशोत्सव मंडळ वाळकेश्वर येथे आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आम्ही त्यावर आधारित देखावा सादर केला आहे. मंडळाचा देखावा पाहण्यासाठी पहिले ४-५ दिवस मुंबईतील अनेक मंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील रहिवासी येतात, पण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून रस्ते बंद असल्याने दरवर्षी होते ती गर्दी झाली नाही. आमच्या मंडळात पहिल्या ५-६ दिवसात तीन लाखांपर्यंत भाविक येतात, यंदा लाखांच्या घरात गर्दी आतापर्यंत आली, त्यात आंदोलनाचे कार्यकर्ते अधिक होते, अजून शनिवारपर्यंत वेळ आहे, तोपर्यंत भाविक नेहमीसारखी गर्दी करतील, असा विश्वास आहेबिपिन कोकाटे, सचिव पिंपळेश्वर मित्रमंडळ
फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ हे आमचे मंडळ डीसीपी झोन - १ मध्ये येते. परिसरातील रहिवाशांसह आमच्या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी व्ही. टी स्टेशनला मेलने येणाऱ्या प्रवाशांपासून ते मुंबई सोडून गेलेले हजारो मुंबईकर अगत्याने येतात. वीकेन्डला हमखास देखावे पाहण्यासाठी भाविक येतात. यंदा शनिवारी गर्दी होती, पण जास्त आंदोलकांची होती. बहुतांशी मुंबईकर रात्रभर दक्षिण मुंबईतील गणपती पाहतात, परंतू यंदा आंदोलकांची वाहने, वाहतूक कोंडी आणि दक्षिण मुंबईतील काही अंतर्गत रस्ते बंद असल्याने हार्बर आणि सेंट्रल लाईन मार्गे येणाऱ्या भाविकांच्या गर्दीत घट होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर आमचे मंडळ दरवर्षी उत्सवात सार्वजनिक आरोग्य शिबिर घेते. मात्र आमच्या भागातील रहिवाशांबरोबरच परिसरात वास्तव्यास असलेले आंदोलक जर सहभागी झाले तर ते हाताळणे मंडळाला कितपत शक्य होईल, यामुळे आम्ही यंदा हे शिबिर घेण्याचे टाळले आहेनयन डुंबरे, सचिव फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ