naxal  File Photo
मुंबई

Gadchiroli Naxal Surrender: हिंसेचा मार्ग सोडून विकासाकडे; 794 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून सुरू केले नवे आयुष्य

गडचिरोलीतील ‘नवजीवन कॉलनी’त शांत जीवन; केंद्र-राज्य योजनांमुळे पुनर्वसनाला गती

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मृणालिनी नानिवडेकर

भारतातून नक्षलवादाचे उच्चाटन 31 मार्चच्या आत होईल ही भारत सरकारची घोषणा दोन पॉलिट ब्यूरो सदस्य वगळता सर्व बडे नक्षलवादी शरण आल्याने प्रत्यक्षात येते आहे.

एकेकाळी क्रांती प्रत्यक्षात आणण्यासाठी रक्ताची आस लागलेले, जग लाल करण्यासाठी जीवावर उदार होऊन रानोमाळ भटकणारे नक्षलवादी आता शांत आयुष्य जगत आहेत.

महाराष्ट्राने 2005 पासून सुरू केलेल्या आत्मसमर्पण योजनेत 794 जहाल नक्षलवादी हिंसेची साथ सोडून विकासाची कास धरत आहेत. हातातील बंदुकीने व्यवस्थेच्या विरोधात लढण्याच्या नावाने निष्पापांना टिपणारी ही क्रांतिकारी मंडळी आता शांतीत नवे जीवन रचत आहेत.

गडचिरोलीत पोलिसांना शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांचे पुनर्वसन उत्तमरीतीने सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा विपरीत अनुभव अजूनपर्यंत आलेला नाही, असे सांगतात. गडचिरोलीत नवजीवन कॉलनी नावाने उभारण्यात आलेल्या एका सुंदर वसाहतीत यातील 102 माजी नक्षलवादी शांततापूर्ण जीवन जगत आहेत.

यातील काहींनी एकेकाळी किती लोकांना मारले आणि किती जीवांना यमसदनाला पाठवले, याच्या कहाण्या ते अत्यंत क्षमा भावनेने सांगत आहेत.

मुंबईत अर्ध वार्षिक पोलिस बैठकीसाठी आलेले गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल ‌‘पुढारी‌’शी बोलताना म्हणाले, शरण आलेल्या भूपती या नक्षलनेत्यासह ही सर्व मंडळी आजपर्यंत उत्तम सहकार्य करत आहेत. झाले गेले विसरून नवीन काही करण्यावर त्यांचा भर आहे.

केंद्र व राज्याच्या योजनांचे लाभ

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत रमाई, पंतप्रधान आवास, दुग्धविकास योजना, असे लाभ दिले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण सुरू झाले आहे. महाराष्ट्राने पूर्वीपासूनच दल सदस्य असलेले नेते समोर आले तरच शरणागतांमध्ये समावेश करायचा, असे ठरवले आहे. तरीही 794 नक्षलवादी आता बदलले आहेत.

154 जणांना भूखंड वाटप, तर 73 जणांना स्टील उद्योगात संधी

ठिकठिकाणचे गावकरी काही राज्यांमध्ये शरणार्थी दाखवले जात असले, तरी महाराष्ट्राने याबाबत नियमात कोणतीही शिथिलता येऊ दिलेली नाही. नक्षलवाद सोडून विकासगंगेत सामील होण्यासाठी पुढे आलेल्या या पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना 154 भूखंड देण्यात आले आहेत. त्यावर ते शेती करत आहेत. 73 माजी नक्षलवादी आता लॉईडस्‌‍ मेटल या उद्योग समूहामध्ये काम करत आहेत. जंगल कपारीत राहणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या या मंडळींपैकेी 73 माजी नक्षलवाद्यांना आता सरकारी ओळखपत्रे मिळाली आहेत. काही माजी नक्षलवाद्यांनी आता पाचवी आणि सहावीची परीक्षा यावर्षी दिली असून, शिकणे आनंददायक असल्याचे ते सांगतात.

नक्षलवादी महिला उद्योगिनी

आत्मसमर्पित नक्षलवादी मंडळींच्या हालचाली आजही सरकारच्या देखरेखीखाली असतात. माजी नक्षलवादी महिला आता उद्योगिनी झाल्या आहेत. जंगल उत्पादनावर प्रक्रिया करून या महिला त्या विक्रीला ठेवतात. संदीप पाटील नागपूर परीक्षेत्र पोलिसप्रमुख यांनी या संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवले असून, शहरी नक्षलवाद वाढू नये यासाठी चोख देखरेख ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT