11th admission  file photo
मुंबई

11th admission : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी १३ जूनला

उद्यापासून नोंदणी, भाग-१ मधील चुका सुधारण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने गुरुवारी जाहीर केले. त्यानुसार दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी (अलॉटमेंट लिस्ट) १३ जून रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध होणार असून, विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती आणि महाविद्यालयांच्या पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया ६ जूनपासून सुरू होणार आहे.

पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश निश्चितीची मुदत संपल्यानंतर आता दुसऱ्या फेरीची तयारी सुरू झाली आहे. राज्यभरातून १२ लाख ५१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून, त्यापैकी सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तर मोठ्या संख्येने विद्यार्थी अद्याप पुढील फेरीत सहभागी होणार असल्याने दुसऱ्या फेरीकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

दुसऱ्या फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी करण्यासोबतच अर्जाच्या भाग-१ मधील माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. पहिल्या फेरीत अर्जातील त्रुटींमुळे किंवा चुकीच्या माहितीसंदर्भात अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांनी भाग-२ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरून अर्ज 'लॉक' करणे बंधनकारक रा-हणार आहे. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांचे पर्याय निवडता येणार आहेत.

शिक्षण संचालनालयाच्या माहितीनुसार, १३ जून रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून शुल्क भरत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

प्रवेश निश्चितीची प्रक्रिया १६ जूनपर्यंत सुरू राहील. त्यानंतर १८ जून रोजी तिसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असून, १९ जून रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

  • नवीन नोंदणी, भाग-१ दुरुस्ती, पसंतीक्रम भरणे व अर्ज लॉक करणे

  • ६ जून (सकाळी ८) ते ९ जून (सायं. ६)

  • अलॉटमेंट प्रक्रिया

  • १० ते १२ जून

  • दुसरी प्रवेश वाटप यादी जाहीर

  • १३ जून, सकाळी १०

  • प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया

  • १३ जून दुपारी १२ ते १६ जून सायं. ६

  • कनिष्ठ महाविद्यालयस्तरीय कामकाज

  • १७ जून

  • तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

  • १८ जून

  • रिक्त जागांची यादी जाहीर

  • १९ जून, सकाळी ११

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT