मुंबई : पवन होन्याळकर
शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने उलटले. शिक्षकांनी निम्मा अभ्यासक्रम संपवून परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. दीवाळीच्या सुट्टीची वेळ आली. तरीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. दहा फेर्या पूर्ण झाल्या. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरी अचानक अकरावीची फेरी सुरू झाली आहे. यात आता सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. प्रश्न हा आहे की, इतके दिवस विद्यार्थी मिळत नव्हते, मग आता हे विद्यार्थी होते तरी कुठे? हा सवाल पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दहा फेर्यांनंतरही प्रवेश न घेणार्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत एकूण 6 हजार 262 विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यापैकी 5 हजार 641 जणांना 10 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजेच वर्ग सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया थांबत नाही असेच दिसून येत आहे. या ना त्या कारणाने शालेय शिक्षणविभागाकडून हे प्रवेशाच्या फेरी सुरूच आहेत.
15 सप्टेंबरपर्यंत दहा फेरी संपल्या होत्या. तब्बल 15 दिवसांनंतर आणखी एका फेरीचे नियोजन करत प्रवेश सुरू केले आहेत. राज्यातील 9 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयांतील 21 लाख 71 हजार जागांसाठी राबवलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत 13 लाख 33 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर तब्बल 8 लाख 35 हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या राहल्यामुळे या फेर्या सुरू आहेत का? असा सवालही उपस्थित होत आहे.
महाविद्यालयातून नाराजीचा सूर
दरवर्षीप्रमाणे यंदाही वारंवार वाढवलेल्या फेर्यांमुळे महाविद्यालयीन व्यवस्थापनामध्ये तीव्र नाराजी आहे. प्राचार्यांचे म्हणणे आहे की, जूनमध्ये सुरू होणारी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन हे जानेवारीपासूनच आखले पाहिजे. उशिरा प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, प्रकल्प आणि मूल्यमापनाचे नियोजन अशक्य बनते. प्रवेश दिला म्हणजे काम संपले असे शिक्षण संचालनालयास वाटत असले तरी या उशिरा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण, मूल्यमापन आणि परीक्षा व त्यानंतर निकालाची जबाबदारी महाविद्यालयांची असते. प्रवेश प्रक्रियेला एक निश्चित कट ऑफ डेट ठरवलीच पाहिजे, अन्यथा शैक्षणिक शिस्त आणि अध्यापनाचा दर्जा दोन्ही धोक्यात येणार असल्याचेही अनेक शिक्षकांनी सांगितले.
75 टक्के उपस्थितीचे काय?
अकरावी-बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. आता जे विद्यार्थी ऑक्टोबरमध्ये प्रवेश घेत आहेत, त्यांची उपस्थिती कशी मोजायची? तीन महिने वर्गात न येताही त्यांना परीक्षा द्यायची परवानगी मिळणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार असाही प्रश्नही आहे.
प्रवेश संपणार कधी...
शालेय शिक्षणातील नियोजनाचा अभाव, उशिरा होणारे निर्णय आणि सातत्याने वाढवली जाणारी प्रवेश प्रक्रिया यामुळे शिक्षण व्यवस्थेचा तोलच बिघडत आहे. तीन महिने वर्ग सुरू असताना अजूनही प्रवेश घेणारे विद्यार्थी दिसतात, तेव्हा प्रत्येकाच्या मनात हे विद्यार्थी अजून का प्रवेशासाठी थांबले यांना मार्गदर्शन करणार कोण? नोंदणीतून कोट्यवधी रुपये मिळवणारा शिक्षण विभाग विद्यार्थी मार्गदर्शनासाठी जाहीरातीसाठी एक रुपयाही खर्च करत नाही.याला जबाबदार कोण? असा सवालही पालकांकडून उपस्थित होत आहे.