मुंबई : शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 10 एप्रिलपासून सुरुवात झाली असूनही राज्यभरातून आतापर्यंत 2 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या पहिल्या भागाची अंतिम नोंदणी केली आहे. मुंबई विभागातही प्रतिसाद मर्यादित असून एकूण 56 हजार 404 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जात ही प्रक्रिया पार पडली होती. यंदा मात्र ती अधिक सुरळीत व्हावी यासाठी शिक्षण संचालनालयाने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणीची अंतिम मुदत 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या कालावधीत दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
गुरुवारपर्यंतची नोंदणी
मुंबई शहर/उपनगर - 25,490
ठाणे - 18,274
रायगड - 5,917
पालघर- 6,723
इतर जिल्हे -2,23,037
एकूण-- 2,79,441