मुंबई : शिक्षण विभागाने यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत तब्बल 6 दिवसांची ‘कात्री’ लावली आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्यासाठी तब्बल नऊ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता; मात्र यंदा अर्जाचा भाग-2, निवड, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम, कागदपत्रांची पूर्तता आणि दुरुस्तीसाठी अवघे दोन दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांवर अल्पावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा ताण निर्माण होणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार 21 मे सकाळी 8 वाजल्यापासून 22 मे सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित फेरी क्रमांक 1 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या काळात विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती, भाग-2 भरणे तसेच किमान एक ते कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम निश्चित करावे लागणार आहेत.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका, आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे, महाविद्यालयांची माहिती यासाठी विद्यार्थ्यांना फारसा वेळ मिळालेला नाही. वेळापत्रकानुसार 23 ते 26 मेदरम्यान विद्यार्थ्यांचे ‘अलॉटमेंट प्रोसेस’ होणार असून 26 मे रोजी पहिल्या नियमित फेरीतील प्रवेश वाटप जाहीर केले जाणार आहे.
त्यानंतर 26 ते 28 मेदरम्यान विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन कागदपत्र पडताळणी, शुल्क भरणे आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामध्येही 27 मे रोजी बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी असल्याने महाविद्यालये बंद राहणार आहेत. यामुळे दोनच दिवस विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
दरम्यान, व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठीची ‘शून्य फेरी’ प्रक्रिया 18 ते 20 मेदरम्यान पार पडणार आहे. या कालावधीत रिक्त जागा जाहीर करणे, यादी प्रसिद्ध करणे आणि कोट्यातील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी 26 मे ते 3 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना नोंदणी आणि पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती. तसेच 11 ते 18 जूनपर्यंत प्रवेश निश्चितीसाठी मुदत होती. तुलनेत यंदा संपूर्ण प्रक्रिया अधिक संक्षिप्त करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्यातील 9 हजार 263 कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी राज्यभरातून 9 लाख 54 हजार 939 विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. यंदा राज्यात कॅप अंतर्गत 16 लाख 10 हजार 293 जागा उपलब्ध आहेत, तर कोटा अंतर्गत 4 लाख 59 हजार 653 जागा आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठीची ‘शून्य फेरी’ 18 मेपासून सुरू होणार असून 18 व 19 मे रोजी रिक्त जागा आणि महाविद्यालयनिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 19 मे रोजी विद्यार्थ्यांची निवड व जागावाटप प्रक्रिया पार पडेल, तर 20 मे रोजी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कागदपत्र पडताळणी, शुल्क भरणे आणि प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 21 मेपासून नियमित कॅप फेरी क्रमांक 1 सुरु होणार आहे.