मुंबई: अकरावीच्या पहिल्या फेरीत महाविद्यालयाचे वाटप होऊनही तब्बल 1 लाख 99 हजार 277 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्याकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. राज्यातील 21 लाख 98 हजार 666 जागांपैकी केवळ 4 लाख 7 हजार 273 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून त्यामध्ये कॅपमधील 3 लाख 75 हजार 668 आणि व्यवस्थापन, अल्पसंख्याक आदी कोट्यातील 31 हजार 605 प्रवेशांचा समावेश आहे. त्यामुळे तब्बल 17 लाख 91 हजार 393 जागा पहिल्या फेरीनंतर रिकाम्या राहिल्या आहेत.
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या गुणवत्ता यादीच्या अगोदर राज्यभरातून अकरावीसाठी 12 लाख 51 हजार 259 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 8 लाख 87 हजार 264 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील भाग-1 आणि भाग-2 पूर्ण करून पसंतीक्रम निश्चित केला. यापैकी पहिल्या यादीत महाविद्यालय पसंतीनुसार प्रवेश मिळाल्यानंतरही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित न केल्याचे चित्र राज्यभर दिसून आले.
पहिल्या फेरीत एकूण 5 लाख 74 हजार 945 विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे वाटप झाले होते; मात्र त्यापैकी केवळ 3 लाख 75 हजार 668 विद्यार्थ्यांनीच कॅपमधून प्रवेश निश्चित केला. परिणामी 1 लाख 99 हजार 277 विद्यार्थी प्रवेश मिळूनही प्रत्यक्ष प्रवेशापासून दूर राहिले आहेत.
पसंतीच्या महाविद्यालयाची अपेक्षा, डिप्लोमा, आयटीआय किंवा इतर अभ्यासक्रमांकडे वळलेले विद्यार्थी, तसेच पुढील फेरीत अधिक चांगला पर्याय मिळण्याची शक्यता यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्याचे टाळल्याचे मानले जात आहे.
विशेषतः मुंबई आणि पुणे या दोन विभागांत मिळून 1 लाख 8 हजार 777 विद्यार्थी प्रवेश मिळूनही दूर राहिल्याने पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी वाट पाहिली आहे. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये कट-ऑफ वाढ किंवा कमी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठी संधी वाढणार आणि पसंती क्रम बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील एकूण 4 लाख 7 हजार 273 प्रवेशांपैकी 31 हजार 605 प्रवेश कोट्यातून, तर उर्वरित 3 लाख 75 हजार 668 प्रवेश कॅप प्रक्रियेतून झाले आहेत. पहिल्या फेरीनंतर कॅप आणि कोटा यामध्ये फारसे प्रवेश झालेले नाहीत. यामुळे राज्यात 17 लाख 91 हजार 393 जागा रिक्त आहेत.
सर्वाधिक 4 लाख 9 हजार 1 रिक्त जागा मुंबई विभागात असून त्यापाठोपाठ पुणे विभागात 3 लाख 16 हजार 441 आणि छत्रपती संभाजीनगर विभागात 2 लाख 70 हजार 804 जागा रिक्त आहेत. सर्वात कमी रिक्त जागा लातूर विभागात असल्या तरी तेथेही 1 लाख 28 हजार 268 जागा अद्याप भरायच्या आहेत. त्यामुळे पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत.
दहावीचे अनेक विद्यार्थी एकाच वेळी डिप्लोमा, आयटीआय, सीबीएसई, आयसीएसई तसेच इतर पर्यायी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी असल्याने त्यांच्याकडून अकरावीतील जागा स्वीकारल्या जात नाहीत.
काही विद्यार्थी पुढील फेऱ्यांमध्ये अधिक पसंतीच्या महाविद्यालयाची संधी मिळेल या अपेक्षेनेही प्रवेश निश्चित करण्यास विलंब करतात. पुढील प्रवेश फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची संधी वाढणार आहे. मिळालेली गुण आणि महाविद्यालयांचा पसंती क्रम याचा ताळमेळ घालूनच महाविद्यालयांचे पर्याय पुढील फेरीत निवडावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.