Fund of Rs 1086.75 crore for Mumbai suburbs np88
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध घटकांचा आणि वास्तूचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून 1086.75 कोटींचा निधी संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात आला. यामुळे सन 2024-25 मधील अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्याचे निर्देश उपस्थित यंत्रणांना देण्यात आले. वांद्रे येथे मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच पार पडली.
सन 2024-25 मधील मंजूर कामांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यास एकूण प्राप्त 1088.77 कोटी निधीपैकी रुपये 1086.75 कोटी अर्थात 99.8 % निधी बृहन्मुंबई महापालिका, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेरी टाईम बोर्ड, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी इ. यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे. सन 2024-25 मध्ये हाती घेतलेल्या कामांचा योजनानिहाय व कामनिहाय अहवाल सदर बैठकीत सादर करण्यात आला.
यावेळी बैठकीत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार, उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या उपस्थितीत या बैठकीत लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. त्यानुसार संबंधित विभागांनी बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन विनाविलंब कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले. सदर बैठकीस मुंबई उपनगर जिल्ह्यातील खासदार, आमदार, मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, इतर विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कार्यान्वयीन यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.
सन 2025-26 मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) रुपये 1066.00 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना रुपये 71.00 कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत रुपये 7.02 कोटी असा एकूण रुपये 1144.02 कोटी निधी अर्थसंकल्पित झाला आहे. सन 2024-25 मध्ये अखेर रुपये 16.95 कोटी रकमेच्या नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच सन 2024-25 मधील दायित्व असलेल्या कामांचा निधी प्राधान्याने वितरीत केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
मुंबईतील झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अंतर्गत रस्ते, ड्रेनेज सिस्टीम, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक जमिनीवर खेळाची मैदाने, आंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती, दरडप्रवण भागातील संरक्षक भिंती अशा प्रकारची कामे तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा 597.42 कोटी
झोपडपट्टीवासीयांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेंतर्गत संरक्षक भिंत बांधकामे 125 कोटी
कौशल्य विकास कार्यक्रम 4.50 कोटी
दलितवस्ती सुधार योजना 64.74 कोटी
पोलीस व तुरुंग यांच्यासाठी विविध आस्थापनांकरिता पायाभूत सुविधा पुरविणे 14.06 कोटी
गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरणासाठी 4.50 कोटी
महिला व बाल विकास 3 टक्के निधी 14.06 कोटी
नवीन बालगृह मानखुर्द, चेंबूर चिल्ड्रेन हॉल, बाल कल्याण नगरी, अतिरिक्त बालगृह येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी 1.60 कोटी
पशुवैद्यकीय दवाखाने, चिकित्सालये यांचे बांधकाम व बळकटीकरणासाठी 85 कोटी
गोरेगाव येथे मल्टिस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यासाठी 59 कोटी
अपारंपरिक उर्जा विकासाकरिता 2 कोटी