Chhagan Bhujbal news Pudhari
मुंबई

Maharashtra Fuel Sales: राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे 23 टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल 52 टक्के वाढ: मंत्री भुजबळ

डिझेल विक्रीतही अनेक जिल्ह्यांत 60 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील जिल्हानिहाय विक्रीच्या आकडेवारीनुसार दैनंदिन विक्रीत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्यात पेट्रोल विक्रीत सुमारे 23 टक्के तर डिझेल विक्रीत तब्बल 52 टक्के वाढ झाली आहे.

अकोला येथे पेट्रोल विक्रीत 44 टक्के, बुलढाणा येथे 47 टक्के, जालना येथे 49 टक्के तर वर्धा येथे 43 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. डिझेल विक्रीतही अनेक जिल्ह्यांत 60 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिली.

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचा दावा भुजबळ यांनी यावेळी केला. भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रालयात पेट्रोल व डिझेल वितरणासंदर्भात आढावा बैठक झाली.

या बैठकीनंतर भुजबळ यांनी सांगितले की, राज्यात काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये.

तेल कंपन्यांना जिल्हा व तालुका स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात पुरेसा इंधनसाठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती नागरिकांपर्यंत सातत्याने पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी किरकोळ घटनांच्या आधारे इंधनटंचाईच्या अफवा पसरवल्या जात असून त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आणि तेल कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खरेदीवर लक्ष ठेवून अतिरिक्त साठेबाजी रोखावी, असे निर्देशही मंत्री भुजबळ यांनी दिले.

दरम्यान, बैठकीत एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धता व वितरण व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT