नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांत फळांचे दर दोनशेच्या घरात गेले होते. त्यामुळे भाविकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. उत्सव संपताच मागणी कमी झाल्याने फळांच्या दरात 20 ते 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दर उतरले असले तरी किरकोळ बाजारात अजूनही लूट सुरूच आहे.
गणेशोत्सव काळात फळांच्या मागणी मोठी होती. त्यात आवक नियमित असल्याने दरवाढ झाली होती. सफरचंद, संत्री, मोसंबी, सीताफळ आदी फळांचे दर आवाक्याबाहेर गेले होते. वाशीतील घाऊक बाजारात सफरचंदांचा दर 80 ते 130 रुपये किलोपर्यंत होता. आता 70 ते 110 रुपये किलोवर आला आहे. संत्र्यांचा दर 20 ते 40 रुपये किलोपर्यंत, पेरू 12 ते 25 रुपये, खरबूज 31 ते 33 रुपये, पपई 15 ते 23 रुपये, सीताफळ 80 ते 120 रुपये, तर मोसंबी 26 ते 36 रुपये किलो इतका आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळ बाजारात रोज सरासरी साडेतीन ते चार हजार क्विंटल सफरचंद, पाचशे क्विंटल संत्री व दीड हजार क्विंटल सीताफळांची आवक होत आहे. मात्र गणेशोत्सवात मोठी मागणी होती. मात्र आता मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दर उतरले असल्याचे फळ व्यापारी अशोक पुंडे यांनी सांगितले.
गणेशोत्सवात फळांच्या दरात वाढ झाली होती. पण आता 20 ते 25 टक्के घसरण झाली असून दर स्थिर आहे. नवरात्रीमध्ये पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे.वसीम शेख, व्यापारी