मुंबई

शुभ्र शिधापत्रिकाधारकांना मोफत आरोग्य योजनेचे लाभ

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख रुपयांच्या मोफत आरोग्य विम्याचा लाभ घेता येईल, असा निर्णय यापूर्वीच झाला असताना आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड शुभ्र शिधापत्रिकाधारकांना बनवून घ्यावे लागणार आहे. यासाठी ही शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत संलग्न करणे बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

त्यानुसार या शिधापत्रिका आधार क्रमांकासोबत संलग्न करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे आदेश राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि सर्व उपसंचालक शिधावाटप यांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे यासंबंधीचा शासन आदेश अलीकडेच जारी करण्यात आला आहे.

1 लाख व त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न असणारे किंवा सिंचनाखाली 4 हेक्टरपेक्षा अधिक जमीन असणार्‍या कुटुंबांना शुभ्र शिधापत्रिका दिली जाते. शासनाच्या आरोग्य योजनांचे लाभ या शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत नव्हते. मात्र, राज्य सरकारने गेल्याच वर्षी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे एकत्रीकरण करून या योजनांचे लाभ शुभ्र शिधापत्रिकाधारकांना देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या योजनेचे लाभ घेण्यासाठी शुभ्र शिधापत्रिकाधारकांना आयुष्मान कार्ड बनविणे आवश्यक असेल.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT