वाशी (मुंबई) : ऐन निवडणुकीच्या तोंडावर विविध सण आल्याने दिपावली निमित्त राजकारण्यांकडून संपूर्ण शहरांमध्ये फुकटात जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यामुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत असून महापालिकेचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे; मात्र विभाग अधिकाऱ्यांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे.
विशेष म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी मुख्यालय समोर पालिकेच्या नाकाखालीच अनधिकृत फलक लावले आहेत. याच पदाधिकाऱ्याने संपूर्ण शहरात आमदारांचे छायाचित्र टाकून त्यांच्याआडून जाहिरातबाजी केली आहे.
या ठिकाणी लावले अनधिकृत जाहिरात फलक
तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत आयसीएल शाळा, तुर्भे नाका, तुर्भेगाव तलाव, तुर्भे स्टोअर, अरेंजा सर्कल, कोपरी सेक्टर २६, एपीएमसी मार्केट परिसर, वाशी विभाग कार्यालय अंतर्गत वाशी डेपो, वाशी सेक्टर १७, सेक्टर १, सेक्टर १५/१६, सेक्टर २९, तसेच सीबीडी बेलापूर दिवाले गाव, अग्रोली गाव, नेरूळ अक्षर चौक नेरूळ, गायमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी, कोपरखैरणे गुलाबसन डेअरी, कोपरखैरणे डी मार्ट, ऐरोली सेक्टर ५ चौक, घणसोली यासह सर्वच ठिकाणी गल्लोगल्ली विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणारे अनधिकृत जाहिरात फलक लावले आहेत.
फुकट्यांकडून मनपाचा महसूल बुडला
जाहिरातींद्वारे महापालिकेच्या तिजोरीमध्ये प्रतिवर्षी लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो; मात्र अशा प्रकारे सण उत्सवांच्या आडून फुकटात जाहिरात बाजी केल्याने महापालिकेचा लाखो रुपयांच्या महसूल बुडत आहे.
पालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
संबंधित विभाग कार्यालयातील विभाग अधिकारी यांनी यावर गुन्हे नोंद करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करणे हे विभाग अधिकारी यांचे काम आहे. असे असतानाही राजकीय दबावामुळे विभाग अधिकारी आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवा केली, तरच या शहराच्या या विद्रुपीकरणाला आळा बसू शकेल असे मत जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.