मुंबई : मुंबई महापालिकेच्या ऐन निवडणुकीत दहिसरमध्ये ठाकरे गटाला मोठा बसला आहे. रविवारी ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केल्यानंतर काही तासांत मुंबई महापालिकेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.
त्यांनी प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यानंतर कांदिवली येथील महायुतीच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
शुभा राऊळ यांचे दहिसर प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठ वर्चस्व आहे. मध्यंतरी त्यांचा माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याशी वाद झाला होता. त्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे त्यावेळी दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे त्या नाराज होत्या.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती झाली आहे, तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. त्यामुळे मुंबईत भाजप, शिवसेना युतीसमोर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे मोठे आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची आघाडीदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढणार आहे. अशावेळी उबाठा पक्षातील जुने आणि अनुभवी शिवसैनिक व पदाधिकारी भाजपा आणि शिंदे गटाकडून फोडण्यात येत आहेत.