Kishori Pednekar Pudhari
मुंबई

BMC Opposition Leader: माजी महापौर आता विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत

महापालिकेच्या इतिहासात लिहिला जाणार नवा अध्याय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महापालिका सभागृहात आता माजी महापौर विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. गेल्या ५० वर्षात महापौर पदी विराजमान झालेला विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे महापालिकेच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

मुंबई महापालिकेमध्ये १९९७ पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता आहे. तसे बघायला गेले तर, १९९६ मध्ये शिवसेनेचा महापौर बसला. त्यानंतर सलग २०२२ पर्यंत शिवसेनेचा महापौर होता. तर आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस नगरसेवकांना सर्वाधिक संधी मिळाली आहे. महापालिकेत आतापर्यंत किसन जाधव, बस्तीवाला, गुणवंत शेठ, ज्ञानराज निकम, प्रवीण छेडा, राजहंस सिंह, देवेंद्र आंबेरकर, रवी राजा हे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते झाले आहेत. आता पहिल्यांदाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात आता नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

गेल्या २५ वर्षात शिवसेनेला अनेकांनी सत्ताधारी म्हणून पाहिले आहे. पण आता विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवावे लागणार आहे. महापालिकेमध्ये विरोधी पक्षात बसण्याची फारशी सवय नसलेली शिवसेना, काँग्रेस, मनसे व अन्य पक्षांना एकत्रित घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधात कसा सामना करणार हा आता येणारा काळच सांगणार आहे. विरोधी पक्षांमध्ये विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर हे चार माजी महापौर असून स्थायी, सुधार, व अन्य समित्यांचा अनुभव असलेले अनेक नगरसेवक आहेत. त्यामुळे या अनुभवाचा फायदा कशाप्रकारे उचलावा याची कस लागणार आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते पद गेले

मुंबई महापालिकेत आजवर काँग्रेसनेच विरोधी पक्षनेतेपदी आपली पकड निर्माण केली होती. अगदी २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३१ नगरसेवक निवडून येऊनही त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळाले होते. भाजपाने पहारेकराची भूमिका घेतल्यामुळे काँग्रेसला फायदा झाला होता. परंतु गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेते पद आता शिवसेना सांभाळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT