

राजापूर : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा झाली. तावडे या राजापूर तालुक्यातील विलये गावच्या सासरवाशीण (सून) असून मुंबई महानगरपालिकेवर महापौरपद भूषविण्याची राजापूर तालुक्याला प्रथमच संधी लाभली आहे. तावडे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर विलये गावी आनंद व्यक्त करण्यात आला. विशेष योगायोग म्हणजे यापूर्वी विलये गावचेच रमेश मेढेकर हे मुंबई मनपावर भाजपकडूनच उपमहापौर झाले होते.
शिवसेनेच्या सत्ता काळात शिवसेनेचा सदैव बालेकिल्ला राहिलेल्या तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शिवसेना, नगरसेवकांना महापौरपद भूषविता आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केल्यास शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष दत्ताजीराव नलावडे, श्रद्धा जाधव आदी मुंबईचे महापौर होते. त्यांच्या रूपात संगमेश्वर तालुक्याला बहुमान मिळाला होता.
मात्र राजापूर तालुक्यातील कोणत्याच मुंबईवासीयाला महापौरपदाची संधी आजवर लाभली नव्हती, पण विलये गावचे सुपुत्र रमेश मेढेकर यांना शिवसेना - भाजप युतीमधून मुंबईचे उपमहापौरपद भूषविता आले होते. ते भाजपचे नगरसेवक होते आणि तेदेखील विलये गावचेच होते. मुंबई महानगरपालिकेवर महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी मूळ राजापूरवासीयांना संधी देणारा पक्ष भाजप ठरला आहे. हा एक अनोखा योगायोग मानावा लागेल. मुंबई, मनपामध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये मूळ राजापूरवासीय असलेल्या अनेकांचा समावेश राहिला आहे. माजी आमदार गणपतराव कदम हे देखील मुंबई मध्ये नगरसेवक होते. काही महिलादेखील नगरसेविका म्हणून मुंबई मनपावर निवडून गेल्या होत्या. नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये मूळ राजापूर तालुक्यातील काहींचा समावेश आहे. भाजप समवेत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून ही मंडळी मनपात पोहोचली आहेत. त्यापैकी एक असलेल्या रितू तावडे यांचा समावेश आहे.
रितू तावडे या भाजपच्या वतीने घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून निवडून आल्या आहेत. त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंदूर-खरारेवाडीच्या त्या माहेरवाशीण असून ज्योती चंद्रकांत सावंत असे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव आहे. त्यांचे सासर राजापूर तालुक्यातील विलये आहे. त्यांचे वास्तव्य मुंबई मध्ये असते. त्यांच्या कुटुंबियांचे अधूनमधून गावी येणे होत असते. पक्षांतर्गत कामकाज करीत असताना त्यांच्या कार्याची पक्षाने दखल घेतली आणि मुंबई मनपा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली. त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या. दरम्यान, मुंबई मनपाच्या महापौरपद सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाले होते. महापौरपदासाठी मोठी स्पर्धा होती. मात्र रितू तावडे यांनी बाजी मारली आणि महापौर पदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांच्या रूपात मुंबई मनपावर प्रथमच भाजपचा महापौर म्हणून राजापूर तालुक्याला सन्मान लाभला आहे.