मुंबई: व्यापारी अनिश्चितता, पश्चिम आशियातील तणाव, भूराजकीय संघर्ष यामुळे विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेतली आहे. भारतातील एकूण गुंतवणुकीतील विदेशी संस्थांचा वाटा 14.7 टक्क्यांवर आला आहे. जून 2012 नंतरचा हा नीचांक आहे.
एप्रिल 2016मध्ये विदेशी संस्थांचा एकूण गुंतवणुकीतील वाटा 19.9 टक्के होता. त्यात विशेषतः गेल्या दीड वर्षापासून सातत्याने घट होत आहे. मात्र, स्थानिक गुंतवणूक संस्थांनी (डीआयआय) मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने विदेशी संस्थांच्या विक्रीची झळ कमी प्रमाणात बसली. स्थानिक संस्थांचा एकूण गुंतवणुकीतील वाटा 18.9 टक्क्यांवर गेला आहे. विशेषतः सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)मध्ये गुंतवणूक वाढल्याने स्थानिक गुंतवणूक संस्थांचा टक्का वाढण्यास मदत झाल्याचे जे. एम. फायनान्शियल फंडामेंटल रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.
विदेशी संस्थांनी गुंतवणूक काढलेल्या निफ्टीतील 41 पैकी 39 निर्देशांकात स्थानिक गुंतवणूक संस्थांनी गुंतवणूक वाढवली आहे. विदेशी संस्थांनी निफ्टी-50 निर्देशांकातील 41 निर्देशांकातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर कमी केली आहे. आयटी, बँकिंग, फायनान्स, विमा (बीएफएसआय) आणि फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातून विदेशी संस्थांनी काढता पाय घेतला आहे.
या क्षेत्राताला फटका
विदेशी गुंतवणूक संस्थांनी आयटी कंपन्यातील 9 अब्ज 22 कोटी 20 लाख डॉलरची रक्कम काढून घेतली आहे. खालोखाल बीएफएसआय मधून 6 अब्ज 5 कोटी 60 लाख डॉलर आणि एफएमसीजीमधून 3 अब्ज 74 कोटी 40 लाख डॉलरची रक्कम काढून घेतली आहे. केवळ मार्च महिन्यात बीएफएसआयमधून सहा अब्ज डॉलरहून अधिक रक्कम काढून घेतली आहे.
या क्षेत्रात वाढली गुंतवणूक
विदेशी गुंतवणूक संस्थांनी उत्पादन क्षेत्रात 2.89 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली असून, टेलिकॉम क्षेत्रात 2.91 अब्ज डॉलर ओतले आहेत. याशिवाय ऊर्जा क्षेत्रात 58.4 कोटी डॉलर, भांडवली वस्तूंमध्ये 45.5 कोटी आणि मेटल्स क्षेत्रात 12.6 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे.