ठळक मुद्दे
अमेरिकेत प्रवेश अर्जामध्ये मागील वर्षी ४६.४ टक्के घट
कॅनडामध्ये मागील दोन वर्षांत ७०-७५ टक्केपर्यंत घट
यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये विद्यार्थ्यांची मागणी कायम, ऑस्ट्रेलियाने ९ टक्के अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची योजना
मुंबई : अमेरिका आणि कॅनडामध्ये शिक्षण घेण्याच्या इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण सेवा पुरवणाऱ्या आयडीपी एज्युकेशनच्या माहितीनुसार मागील एक वर्षात अमेरिकेसाठी प्रवेश अर्जाची संख्या ४६ टक्क्यांनी कमी झाली आहे, तर कॅनडासाठी ही संख्या मागील दोन वर्षांत सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.
आयडीपी एज्युकेशनच्या दक्षिण आशिया, कॅनडा आणि लॅटिन अमेरिका विभागाचे प्रादेशिक संचालक पीयूष कुमार म्हणाले की, जागतिक राजकीय परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे निर्णय प्रभावित झाले आहेत. अमेरिकेतील व्हिसा मंजुरीच्या दरात गेल्या ६-१२ महिन्यांत घट दिसून आली आहे, असे त्यांनी सांगितले.
कॅनडामध्येही मागील दोन वर्षांत अनेक धोरणात्मक बदल झाले आहेत. कॅनडामध्ये पोस्ट स्टडी वर्क अधिकार आता फक्त सहा क्षेत्रांपुरते मर्यादित केले गेले आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी परत येण्यास भाग पडत आहेत, कुमार यांनी स्पष्ट केले. तथापि यूके आणि ऑस्ट्रेलियामध्ये विद्यार्थ्यांची मागणी अजूनही स्थिर आहे. ऑस्ट्रेलियाने यंदा मागील वर्षापेक्षा ९ टक्के अधिक विद्यार्थी स्वीकारण्याची घोषणा केली आहे. आयडीपी एज्युकेशन सध्या ८०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी भागीदारी करते आणि भारतातील ६३ शहरांमध्ये ७३ कार्यालये आहेत. ते विद्यार्थ्यांना कोर्स व विद्यापीठ निवड, अर्ज प्रक्रिया, व्हिसा सहाय्य आणि प्री-डेपार्चर नियोजन यामध्ये मार्गदर्शन करतात.