मुंबई: मध्य पूर्व आखाती देशातील युद्ध व यावर्षी ऊस उत्पादन घटल्याने खाद्यतेल, साखर व गूळ या जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य पिचून गेले असून जगावे कसे असा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, मुंबईतील बाजारपेठेत सर्वप्रकारच्या खाद्यतेलामध्ये प्रतिलिटर मागे सरासरी ५ टक्के वाढ झाली आहे, तर साखरेचे दर सरासरी ६५ रुपये प्रतिकिलो, साधा गूळ ८० रुपये तर सेंद्रिय गूळ ११० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
दूध, अंडी याचे भावही वाढले आहेत. त्यातच दहा ते पंधरा दिवसापासून खाद्यतेल, साखर व गुळ या रोजच्या जेवणात वापरले जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये कमी- अधिक प्रमाणात वाढ होत आहे. बाजारपेठेत यापूर्वी साखर ४८ ते ५० रुपये प्रतिकिलो पर्यंत होती.
सध्या साखर सरासरी ६५ ते ७० रुपयापर्यत आहे. साखर बरोबर गुळाच्या किमतीमध्येही वाढ झाली आहे. साधा गूळ हा प्रतिकिलो ८० रुपयापर्यंत तर सेंद्रिय गूळ ११० रुपये पर्यंत गेला आहे. एक ते २५ किलोपर्यंत साधा गुळाला ५ टक्के जीएसटी आहे.
मात्र त्यानंतर जीएसटी नसते. बाजारपेठेत पाच-दहा किलो अशा गूळ (ढेपा) उपलब्ध असतात. पण ग्राहकांकडून याची खरेदी जास्त होत नसल्याचे म्हणणे विक्रेत्यांचे आहे. एकीकडे साखरेचा कोटा वाढविल्याचे सरकार सांगत आहे.पण प्रत्यक्षस्थिती पाहता साखरेच्या दरात फारशी घसरण झाली नाही.