मुंबई: राज्यात आठ ते दहा दिवसांपूर्वी झालेला पुरेसा पाऊस आणि पोषक वातावरणामुळे नैसर्गिक फुलशेतीचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांची आवक बाजारात वाढली असून त्याचा दरावर परिणाम झाला आहे.
फुलांमध्ये सरासरी ३० ते ४० टक्के इतकी दरामध्ये घसरण झाल्याचे मुंबईतील फुलबाजारातील विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. फुलांचे दर घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
फुलांची मोठी बाजारपेठ म्हणून दादर फुल बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दादर बरोबर भायखळा याठिकाणी फुलांची बाजारपेठ आहे. बहुतांश; नैसर्गिक फुलांचे घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांकडून फुले घेतात.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नाशिक जिल्ह्यातील चांदवड, अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोळनेर, सातारा जिल्ह्यातील कासपठार व सांगली जिल्ह्यात फुलांचे उत्पादन होते. मात्र; मुंबईतील फुल बाजारात सध्या जुन्नर, कास पठार व सातारा जिल्हयातील नैसर्गिक फुलांची आवक होत आहे.
सध्या दिवसाला २५ ते ३० टेम्पोमधून सुमारे ५० टन फुलांची आवक होते. विशेषत: गणेशोत्सव, दसरा व दिवाळी सणाच्या काळात नाशिक व अहिल्यानगर जिल्हयातील फुलांची आवक याठिकाणी होते. अनेक घाऊक विक्रेते हे थेट शेतकऱ्यांशी जोडून फुले खरेदी करतात.
प्रति किलो दर
झेंडू : पूर्वी ८० रुपये, सध्या ४० ते ५० रुपये शेवंती : पूर्वी १५० रुपये, सध्या १०० रुपयांच्या घरात मोगरा : पूर्वी ८०० ते एक हजार रुपये, सध्या ५०० ते ६०० रुपये निशिगंधा : पूर्वी १०० ते १२० रुपये, सध्या ६० ते ८० रुपये गुलाब : पूर्वी १५० ते २०० रुपये, सध्या ६० ते ८० रुपये
एप्रिल-मेमध्ये लागवड झालेल्या फुलांची सध्या बाजारात आवक होत असून गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे सर्व प्रकारच्या फुलांची आवक वाढली.-दीपक रोकडे विक्रेते, मासाहेब मीनाताई फूल मार्केट, दादर