मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर, सिध्दार्थ नगर, प्रबोधकार ठाकरे क्रीडा भवनसह इतर ठिकाणी मोकाटपणे उच्छाद मांडलेल्या कुत्र्यांना पकडण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. आतापर्यंत सुमारे 5 कुत्र्यांना पकडण्यात आले असून आणखी काही कुत्रे जेरबंद करण्यासाठी तीन डॉग व्हॅन तैनात असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यापासून गोरेगाव पश्चिमेकडील लोकवस्तीसह रस्त्यावर भटक्या कुत्र्यांची दशहत निर्माण झाली आहे. हे कुत्रे रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना चावा घेत आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत सुमारे 20 ते 25 नागरिकांवर हल्ला करण्यात आला आहे. यामुळे पालिकेने सदर ठिकाणी 3 डॉग व्हॅन तैनात केल्या असून भटकी कुत्री दिसल्यास त्यांना पकडले जात आहे.
पिसाळलेला कुत्र्याचा शोध सुरू
मोतीलाल नगर, सिध्दार्थ नगर येथील सुरक्षा रक्षक, विद्यार्थी आणि पादचारी यांना चावा घेतलेला पिसाळलेला कुत्रा अद्यापही पालिकेच्या जाळ्यात अडकलेला नाही. त्याला जेरबंद करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे. मात्र तो अद्यापही आढळून आलेला नाही. कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुत्र्याच्या चाव्याने नागरिकांच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून परिसरातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती देवनार पशुवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.कलिमपाशा पठाण यांनी दै.पुढारीशी बोलताना दिली.