Tiger Shroff firing Case Pudhari
मुंबई

Tiger Shroff firing Case: टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आणखी पाच जणांना अटक; शस्त्रांची पंजाबमधून खरेदी

दोन महिलांद्वारे रेल्वेने मुंबईत तस्करी; तिघा हल्लेखोरांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या जुहू येथील कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवला आहे. आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आठ झाली आहे.

पंजाबमधील अमृतसर येथून पिस्तूल मिळवणे, ती दोन महिलांमार्फत रेल्वेने मुंबईत आणणे आणि प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांपर्यंत पोहोचवणे, असे शस्त्रपुरवठ्याचे जाळे तपासात उघड झाले आहे.

या शिवाय आणखी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. दरम्यान, यापूर्वी राजस्थानातील कोटा येथून अटक केलेल्या तिघा आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अटक केलेल्यांमध्ये कुणाल (वय २१), सुमीत (१९), राधा (२३) आणि बबिता (२३) यांचा समावेश आहे. कुणाल आणि सुमीत हे हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील, तर राधा आणि बबिता या उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.

नव्याने अटक केलेल्या आरोपींपैकी कुणाल आणि सुमीत यांनी पंजाबमधील अमृतसर येथे जाऊन शस्त्रे मिळवली. त्यानंतर ही शस्त्रे त्यांनी राधा आणि बबिता यांच्याकडे सोपवली. या महिलांनी रेल्वेने ती मुंबईत आणून गुप्त ठिकाणी ठेवली. तेथून आरोपींनी ती ताब्यात घेतली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत तपासाची माहिती दिली. त्यानुसार दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री दोन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. तर, पाचव्या आरोपीला बुधवारी हरियाणातील सोनिपत येथून हरियाणा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. या पाचव्या आरोपीने गोळीबारापूर्वी मुंबईत आलेल्या तिघा हल्लेखोरांना राहण्यासह अन्य मदत केल्याचा आरोप आहे.

तांत्रिक तपासाच्या आधारे शस्त्रपुरवठा करणाऱ्या कथित जाळ्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. १८ ऑक्टोबर रोजी जुहू येथे दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफ यांच्या गाडीच्या दिशेने गोळीबार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शोधमोहीम राबवत अवघ्या १५ तासांत राजस्थानातील कोटा येथून तिघांना अटक केली.

रेहान ऊर्फ सुक्का, ऋतिक कुर्मी ऊर्फ रोशन आणि फूलसिंग अशी या तिघांची नावे आहेत. बुधवारी त्यांना कोटा येथून मुंबईत आणून एस्प्लनेड न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने आरोपींच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. गोळीबारात वापरलेली शस्त्रे अद्याप हस्तगत झालेली नसून, त्यांचा स्रोत शोधणे, कटातील अन्य सहभागींची ओळख पटवणे आणि हल्ल्यामागील हेतू निश्चित करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल फोन आरोपींनी नष्ट केल्याचाही पोलिसांचा आरोप आहे.

बचाव पक्षाचा पोलिस कोठडीला विरोध

आरोपींच्या वतीने ॲड. अजिंक्य मिरगल, ॲड. सचिन झळते-पाटील आणि ॲड. सत्यव्रत जोशी यांनी पोलिस कोठडीच्या मागणीला विरोध केला. आरोपींना राजस्थानातून मुंबईत आणण्यासाठी ४८ तासांची ट्रान्झिट रिमांड मिळाली होती. या कालावधीत पोलिसांनी त्यांची चौकशी केल्याचा दावा बचाव पक्षाने केला. ट्रान्झिट रिमांड ही केवळ प्रवासासाठी असते, चौकशीसाठी नाही, असा युक्तिवाद ॲड. मिरगल यांनी केला. मोबाईलचे कॉल तपशील आणि ठिकाणाची माहिती दूरसंचार कंपन्यांकडून मिळवता येते; त्यासाठी आरोपींची दीर्घ पोलिस कोठडी आवश्यक नाही, असेही बचाव पक्षाने म्हटले.

बिष्णोई टोळीशी संबंधांची पडताळणी

या गोळीबाराचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी किंवा अनिल पंडित याच्याशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या कथित ध्वनिचित्रफितीचाही तपास सुरू आहे.

आणखी २ संशयित ताब्यात

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, हरियाणातील सोनिपत येथून ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांपैकी अंकित राजेश खटक याच्यावर मुंबईत राहून हल्लेखोरांसोबत रेकी केल्याचा, तर जतीन याच्यावर हल्ल्यासाठी शस्त्रांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे. दरम्यान, समीर नावाच्या आणखी एका संशयिताची या प्रकरणात भूमिका तपासली जात आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT