‌Tukaram Mundhe News Pudhari
मुंबई

FDA Banned Food Products: एफडीएच्या ३० धाडींमध्ये १.८९ कोटींचा अन्नसाठा जप्त, २८ जणांना अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल दूध डेअरीवर कारवाई करून संशयित तूप, पनीर, साय आणि खाद्यतेलासह ८८० किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ३० जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत धडक कारवाई करत प्रतिबंधित अन्नपदार्थांसह इतर अन्नसाठ्यावर मोठी कारवाई केली. या कालावधीत ३० धाडी टाकून १ कोटी ८९ लाख ४१ हजार ७६६ रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला. १९ गुन्हे दाखल करून २८ जणांना अटक करण्यात आली.

मोहिमेदरम्यान पान मसाला, गुटखा विक्री, वाहतूक व साठवणुकीविरोधात कारवाई करत १ कोटी ६३ लाख ३९ हजार ८७९ रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. तसेच दूध, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेल व इतर अन्नपदार्थांचा २६ लाख रुपयांहून अधिक किमतीचा १३ हजार ५९१ किलो साठा जप्त करण्यात आला.

राज्यातील ९८ हॉटेल, रेस्टॉरंट व धाब्यांची तपासणी करून ५७ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर गंभीर नियमभंग करणाऱ्या १४ आस्थापनांचे एफएसएसएआय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल दूध डेअरीवर कारवाई करून संशयित तूप, पनीर, साय आणि खाद्यतेलासह ८८० किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. नवी मुंबई, पुणे, सांगली, नागपूर आणि अमरावती येथील अनेक हॉटेल्स व अन्न आस्थापनांचे परवानेही स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे निलंबित करण्यात आले.

याशिवाय नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे संशयित निकृष्ट व मिसब्रँडेड मसाले, खाद्यतेल आणि इतर अन्नपदार्थांवरही मोठी कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी सुरू असून अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या "सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय आल्यास एफडीएच्या तक्रार पोर्टल किंवा टोल-फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT