मुंबई: राज्यात औषधांच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘चलता है’ संस्कृतीला महाराष्ट्र ‘एफडीए’ने दणका दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या कारवाईच्या धडाक्यामध्ये जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत राज्यातील २,९०२ औषध विक्री आणि निर्मिती आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
त्यापैकी ८८० परवानाधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ११.४१ कोटी रुपयांचा बेकायदा औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला.
तपासणी केलेल्या आस्थापनांपैकी ७९ टक्के औषध विक्री केंद्रे, तर ६०७ औषध निर्मिती आस्थापना होत्या. विक्री केंद्रांपैकी ७४० ठिकाणी, तर उत्पादन क्षेत्रातील १४० आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
‘एफडीए’ आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, १०४ शोध व जप्ती मोहिमांमध्ये ११.४१ कोटींचा औषध व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला असून, २० गुन्हे दाखल केले आहेत, तर २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
औषध विक्री केंद्रांच्या तपासणीत नियमभंगाची मालिकाच समोर आली आहे. अनेक ठिकाणी नोंदणीकृत फार्मासिस्टच्या थेट देखरेखीशिवाय औषध विक्री सुरू होती. औषधांची खरेदी-विक्री बिलाविना होत होती.
विक्री बिलांवर बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख नमूद करण्यातही हलगर्जीपणा आढळला. अनेक विक्रेत्यांनी शेड्युल एच-1 औषधांचे रजिस्टर अद्ययावत ठेवले नव्हते. कालबाह्य औषधे मुख्य विक्री साठ्यातून वेगळी करण्याऐवजी ती विक्रीयोग्य औषधांसोबतच ठेवण्यात आली होती.
कारवाईमध्ये मादक आणि मनोविकारावर परिणाम करणार्या औषधांच्या प्रत्यक्ष साठ्यात आणि रजिस्टरमधील नोंदीत तफावत आढळल्याने ‘एफडीए’च्या तपासणीने औषध विक्री व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. औषधनिर्मिती केंद्रांची स्थितीही समाधानकारक नसल्याचे तपासणीत उघड झाले.
सक्षम तांत्रिक मनुष्यबळाचा अभाव, प्रशासनाने मंजूर न केलेल्या कर्मचार्यांकडून औषधांच्या उत्पादनाच्या बॅचनिहाय रेकॉर्डमध्ये नोंदी, अपूर्ण चाचणी नोंदी, निर्जंतुकीकरण प्रक्रियेच्या नोंदींचा अभाव आणि ऑटोक्लेव्ह रेकॉर्डमधील विसंगती आढळल्या.
काही ठिकाणी सुमार दर्जाच्या (नॉट ऑफ स्टँडर्ड क्वॉलिटी) औषधांचे उत्पादन तसेच परवान्यात मंजूर नसलेल्या औषधांची निर्मिती होत असल्याचेही समोर आले आहे.
या कालावधीत ‘एफडीए’ने ३७,६०४ नमुने तपासणीसाठी घेतले, तर १५,२६८ नमुने अप्रमाणित ठरल्याची माहिती देण्यात आली आहे. आयुर्वेदिक क्षेत्रात ३०१ तपासण्या; ३१ ठिकाणी कारवाई, तर अॅलोपॅथिक क्षेत्रात १२३ तपासण्या; ५८ परवाने निलंबित किंवा रद्द करण्यात आले.
गंभीर अथवा वारंवार नियमभंग करणार्यांना कारणे दाखवा नोटीस आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर कायद्यानुसार परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेल्या राज्याच्या एका महत्त्वाच्या परंतु, प्रशासकीय मरगळ आलेल्या एका विभागात एक अधिकारी कसा जीव ओतू शकतो, याचे तुकाराम मुंढे हे नमुनेदार उदाहरण आहे.
‘एफडीए’चा तीन महिन्यांचा ‘अॅक्शन रिपोर्ट’
तपासणी केलेल्या आस्थापना : २,९०२
कारवाई केलेले परवानाधारक : ८८०
जप्त केलेला बेकायदेशीर साठा : ११.४१ कोटी रुपये
शोध व जप्ती मोहिमा : १०४
गुन्हे दाखल : २०
आरोपींना अटक : २