MPT Kit Illegal Sale Pudhari
मुंबई

MPT Kit Illegal Sale: एमपीटी किट विक्रीचा पर्दाफाश; नागपूर आणि सोलापूरमध्ये एफडीएची कारवाई

या प्रकरणी नागपूर व सोलापूर येथे इंडियामार्ट या ऑनलाइन पोर्टलच्या संचालकांसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमपीटी किटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे. नागपूर आणि सोलापूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत एमपीटी किटसह अल्प्राझोलॅम आणि सिल्डेनाफिल या औषधांचा एकूण ५४ हजार १८१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी नागपूर व सोलापूर येथे इंडियामार्ट या ऑनलाइन पोर्टलच्या संचालकांसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली. १२ ऑगस्ट रोजी क्लिअर किट आणि प्रेगा एंड या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बेकायदेशीर विक्रीचा शोध घेत नागपूर आणि सोलापूर कार्यालयांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई केली.

नागपूरच्या विनोबा भावे नगरातील डॉ. सचिन मरघडे यांच्या ‘श्री साई दवाखाना’ची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी विनापरवाना औषधांचा मोठा साठा आढळून आला. प्रेगा इंडियन किट आणि मिसोप्रिल किट वरील उत्पादकाचे लेबल आणि बॅच क्रमांक काळ्या शाईने झाकलेले असल्याचेही आढळले.

पुढील तपासात दोन आरोपींकडून अनुक्रमे ६ आणि ४४ एमपीटी किट बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे आढळले. या प्रकरणात डॉ. मरघडे यांच्या दवाखान्यातून अल्प्राझोलॅम आणि सिल्डेनाफिलसह ४५ हजार ६४९ रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त करण्यात आला. यशोधरानगर पोलिस ठाण्यात डॉक्टरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमपीटी किटसारखी गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑनलाइन किंवा अन्य माध्यमातून खरेदी करताना खबरदारी घ्यावी.

इंडिया मार्टच्या माध्यमातून विक्री

सोलापुरात इंडिया मार्ट या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना बेकायदेशीररीत्या एमपीटी किटची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. त्यानंतर औषध निरीक्षक आणि पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. तेथे एमपीटी किटचा बेकायदेशीर साठा आढळून आला.या प्रकरणात इंडिया मार्ट पोर्टलचा सहभाग आढळल्याने त्याच्या संचालकांसह अन्य आरोपींविरुद्ध सोलापुरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT