Crime News pudhari photo
मुंबई

Father Arrested After Son Killed - आधी मुलगा बेपत्ता असल्याचा बनाव, मग पोलिसात तक्रार अन्‌ आता असा लागला गुन्ह्याचा छडा

पत्नीच्या चारित्र्यावरून पित्याकडून मुलाची निघृण हत्या : आरोपीस अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पत्नीच्या चारित्र्यावरुन दहा वर्षांच्या मुलाची त्याच्याच पित्याने हत्या केली. याप्रकरणी गोराई पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी पिता बंटी कालिदास राव (वय ३८) याला अटक केली. बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

२९ जुलैला गोराईतील कुलबेम बिच समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांना एका दहा वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एडीआरची नोंद करून त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याच दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तपासात मालवणी पोलिसांत एका मुलाची मिसिंग तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे तक्रारदार महिलेला त्याची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले.

यावेळी या महिलेने तो मृतदेह त्याचा मुलगा युवराज याचा असल्याचे सांगितले. तिच्या चौकशीदरम्यान किरण बंटी राव ही महिला तिच्या पती बंटी व मुलगा युवराजसोबत मालाडच्या मढ रोड, पास्कलवाडीत राहत होती. तिचा पती बंटी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. २७ जुलैला त्यांच्यात याच कारणावरुन भांडण झाले. भांडणानंतर बंटी हा युवराजसोबत घरातून निघून गेला. मात्र रात्री उशिरा तो एकटाच घरी आला. त्याच्यासोबत युवराज नव्हता. युवराज मिसिंग झाल्याचे सांगून त्यांनी मालवणी पोलिसांत त्याची मिसिंगची तक्रार केली.

या चौकशीनंतर बंटीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरुन युवराजला गोराई बिच येथे आणले होते. त्यांच्यातील भांडणाच्या रागातून त्याने युवराजची पाण्यात बुडवून हत्या केली. त्याचा मृतदेह पाण्यात टाकून तो पळून गेला. यावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी अटक केली. मिसिंग तक्रारीवरुन या हत्येचा पर्दाफाश करण्यात यश आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT