Seeds DNA Test Pudhari
मुंबई

Seeds DNA Test: बियाण्यांचीही होणार डीएनए टेस्ट; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

बियाण्यांच्या डिजिटल नोंदीसाठी 'साथी' पोर्टलचा वापर बंधनकारक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: बोगस बियाणे ओळखण्यासाठी आता बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना बनावट व निकृष्ट बियाणे विक्री केल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला.

बियाणे उत्पादक कंपन्या व विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून द्यावीत. तसेच बियाण्यांची नोंद ठेवण्यासाठी 'साथी' पोर्टलचा वापर बंधनकारक असल्याची माहितीही मंत्री भरणे यांनी दिली.

यंदा संभाव्य एल निनो पार्श्वभूमीवर पाण्याचा ताण सहन करणारे व कमी कालावधीतील वाढणारे वाण उपलब्ध करून द्यावेत. तसेच जिल्हानिहाय पीक नियोजन मजबूत करून पेरणी उशिरा झाली तर पर्यायी पीक नियोजन तयार करा, अशा सूचना कृषी मंत्र्यांनी दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली खरीप हंगाम २०२६ यशस्वी करण्यात येईल.

गुणवत्तापूर्ण बियाण्यांमुळे उत्पादनात साधारणतः १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, हे लक्षात घेता प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांची शंभर टक्के उपलब्धता असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. राज्यात यंदा १४५.२० लाख हेक्टर पेरणी क्षेत्र अपेक्षित असून, त्यानुसार पीकनिहाय बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, खरीप २०२६ साठी राज्याची एकूण बियाणे गरज २०.१६ लाख क्विंटल इतकी असून, सध्या सुमारे२८.१४ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. म्हणजेच गरजेच्या सुमारे १४० टक्के साठा उपलब्ध असून बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत राज्य मजबूत स्थितीत आहे. बियाण्यांची उपलब्धता समाधानकारक असली तरी ती योग्य वेळी आणि योग्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे.

गुणवत्ता, वेळेवर वितरण आणि पारदर्शकता यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या 'साथी' पोर्टलच्या माध्यमातून बियाणे व्यवस्थापन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. साथी प्रणाली म्हणजे बियाण्यांचा संपूर्ण हिशोब ठेवणारी व्यवस्था आहे.

बियाणे कुठे तयार झाले, कोणाला विकले हे सर्व शेतातून शेतकऱ्यापर्यंत ट्रॅक करता येते. त्यामुळे सर्व उत्पादक, पुरवठादार व विक्रेते यांनी सदर प्रणालीचा सक्रिय वापर करावा. योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यापर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही मंत्री भरणे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT