मुंबई: बोगस शुभेच्छापत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावासह स्वाक्षरीचा संदेश पाठवून एका समाजसेविकेकडे खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दोन आरोपींना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. तौसिफ हुसैन इस्माईल पटेल आणि सिद्धिनाथ दीनानाथ पांडे ऊर्फ सुनील अशी दोघांची नावे असून दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.
यातील तक्रारदार समाजसेविका असून त्यांची एक संस्था आहे. ही संस्था गरजू विद्यार्थ्यांसह वृद्धांना तसेच अनाथाश्रमाला मदत करते. काही दिवसांपूर्वी त्यांची तौसिफ आणि फरनाझ वाडिया या दोघांशी ओळख झाली होती.
या ओळखीत त्यांनी ते दोघेही पत्रकार असल्याचे सांगून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने शुभेच्छापत्र देण्याचे आश्वासन दिले होते. ते पत्र मिळाल्यानंतर तिने त्यांना चार लाख रुपये देण्याची मागणी केली होती. सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र 20 मार्चला तिला तिच्या नावाने पंतप्रधानांचे शुभेच्छापत्र पाठविले होते. त्यात स्वत: पंतप्रधानांनी तिला वाढदिवसाचे तसेच तिच्या समाजकार्यासाठी शुभेच्छा दिल्याचे नमूद करण्यात आले होते.
या पत्रानंतर त्यांनी तिच्याकडे चार लाखांची मागणी सुरू केली होती. मात्र ते पत्र बोगस असल्याने तिला तिच्या सहकाऱ्यांनी सांगितले होते. त्यामुळे तिने ते पत्र तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केले होते.
याबाबत तिने त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी तिला त्यांचा एक माणूस पंतप्रधान कार्यालयात कामाला आहे. तोच त्यांना शुभेच्छापत्र पाठवतो. ते पत्र कुरिअरवरून येत नसून थेट मेलवर पाठवत असल्याचे सांगितले. या दोघांनी फसवणुकीसाठी पंतप्रधानांच्या लेटरहेड आणि त्यांची बोगस स्वाक्षरी करून संबंधित पत्र पाठवून तिच्याकडे खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे तिने वरळी पोलिसांत त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या गुन्ह्याचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तौफिक आणि सिद्धिनाथ हे वरळीतील एका हॉटेलमध्ये खंडणीचा हप्ता घेण्यासाठी आले होते. यावेळी तिथे पाळत ठेवलेल्या पोलिसांनी दोघांना खंडणीची रक्कम घेताना अटक केली. चौकशीत त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तक्रारदाराच्या नावाने वाढदिवसांचे शुभेच्छापत्राची फ्रेम, दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांना पंतप्रधानांच्या नावाने बोगस शुभेच्छापत्र दिले आहेत का, त्यांच्याकडे पैसे घेतले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.