Fraud Pudhari
मुंबई

Cyber Fraud: आधार हेल्पलाईनच्या बहाण्याने बँक खाते साफ; ज्येष्ठ नागरिकाला २.५८ लाखांचा फटका

बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची माहिती शोधताना डॉ. अरुण क्षीरसागर यांची फसवणूक; भोईवाडा पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: आधार कार्डच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची माहिती घेण्यासाठी ऑनलाइन हेल्पलाईन क्रमांक शोधणे गरवारे संस्थेचे माजी संचालक डॉ. अरुण क्षीरसागर (८१) यांना महागात पडले.

बनावट आधार हेल्पलाईनच्या माध्यमातून सायबर भामट्यांनी त्यांच्या कॅनरा बँकेच्या खात्यातून तब्बल २ लाख ५८ हजार रुपये परस्पर वळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

डॉ. क्षीरसागर हे परळ गावातील डॉ. वाळिंबे रोड परिसरात राहतात. त्यांचे कॅनरा बँकेच्या परळ शाखेत बचत खाते असून ते इंटरनेट बँकिंगचा वापर करतात. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी आधार कार्डचे बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची खातरजमा करण्यासाठी गुगलवर हेल्पलाईन क्रमांक शोधला.

या शोधादरम्यान त्यांना जस्टडायलवर नोंदविलेल्या संकेतस्थळावर ‘आधार हेल्प सेंटर’ असे नाव दिसले. त्यावरील ‘कॉल नाऊ’ पर्यायावर क्लिक करून त्यांनी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला.

पाच रुपये भरण्यास नकार

फोनवरील व्यक्तीने डॉ. क्षीरसागर यांच्याकडून नाव, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक व ई-मेलची माहिती घेतली. त्यानंतर हेल्पलाइन शुल्क म्हणून ऑनलाइन पाच रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी पैसे भरण्यास नकार देत फोन बंद केला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर नऊ एसएमएस आले.

त्यापैकी काही संदेशांमध्ये ओटीपी असल्याचे तक्रारीत नमूद आहे. कॅनरा बँकेच्या खात्यातून १.१४ रुपये वजा झाल्याचा संदेशही त्यांना मिळाल्यावर त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार इंटरनेट बँकिंगचा पासवर्डही बदलला.

पासवर्ड बदलल्यानंतरही २.५८ लाख रुपये गायब

पासवर्ड बदलल्यानंतरही ७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास त्यांना बँकेचे आणखी सात एसएमएस आले. खात्याची तपासणी केली असता, त्यातून एकूण २ लाख ५८ हजार रुपये वळविण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेशी संपर्क साधून खाते ब्लॉक करण्याची विनंती केली. तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदविली.

मोबाइलवरील संदेश तपासताना त्यांच्या फोनवरील कॉल अन्य क्रमांकावर वळविले जात असल्याचे संकेत मिळाल्याचेही वृत्तात नमूद आहे. त्यानंतर त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीत वापरण्यात आलेला मोबाइल क्रमांक, कॉल फॉरवर्डिंग आणि पैशांच्या व्यवहारांचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT