Maharashtra Rain Alert
पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा राहणार आहे. गोव्यासह महाराष्ट्राला पुढील सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात १६ ते १९ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
दक्षिण छत्तीसगड आणि आजूबाजूच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. ते पश्चिमेकडून वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते हळूहळू कमकुवत होईल. १८ ऑगस्टच्या दरम्यान ओडिशाच्या किनाऱ्याजवळील वायव्य बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. मुख्यतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवसात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे.
दरम्यान, कुलाबा येथील भारतीय हवामानशास्त्र केंद्राने आज ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्राला मुसळधार ते अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. तसेच या जिल्ह्यांसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्रात पुढील चार दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे घाट क्षेत्रासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा घाट क्षेत्रासाठी १८ ऑगस्ट रोजी रेड अलर्ट राहील. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजा आणि गडगडाटासह अधूनमधून ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान केंद्राने म्हटले आहे.