मुंबई : खंडणीच्या गुन्ह्यांत छोटा राजनचा हस्तक डी. के. राव व त्याचे दोन सहकारी अनिल सिंग आणि मिमित घुटा या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी अटक केली. या तिघांनाही शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एका बिल्डरला खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा या तिघांवर आरोप आहे.
यातील तक्रारदार बिल्डर असून त्यांनी त्यांच्या परिचित एका बिल्डरकडून दिड कोटी रुपये व्यवसायासाठी घेतले होते. मात्र काही कारणामुळे त्यांना ती रक्कम व्याजासह परत करता आली नाही. त्यामुळे या बिल्डरने डी. के. रावची मदत घेतली. त्याने त्यांच्या बिल्डर मित्राकडे पैशांची मागणी करून त्यांना खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली. यावर तक्रारदार बिल्डर प्रचंड घाबरले. त्यांनी खंडणीविरोधी पथकात डी. के. रावसह इतर आरोपींविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
विशेष सत्र न्यायालयाच्या आवारातून घेतले ताब्यात
गुन्ह्याचा तपास सुरू असताना न्यायालयीन सुनावणीसाठी आलेल्या डी. के. रावला विशेष सत्र न्यायालयाच्या आवारातून अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर अनिल सिंग व मिमित घुटा या दोघांना नंतर ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. याच गुन्ह्यात तिन्ही आरोपींना शनिवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर केले जाणार आहे. जानेवारी महिन्यात पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला डी. के. रावने अडीच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रावसह इतर सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आता दुसऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.