नवीन मोनो चाचणीतच घसरली pudhari photo
मुंबई

New mono test : नवीन मोनो चाचणीतच घसरली

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मेट्रो सेवा मुंबईकरांच्या पसंतील उतरली असताना मोनारेलची धाव दुर्घटनांत अडकली आहे. वारंवार अपघात घडू लागल्याने सेवा बंद करीत नवीन मोनोसह मुंबईकरांना सेवा देण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. मात्र बुधवारी चाचणीतच नवीन मोनो वडाळा येथे रुळावरून घसरली. या दुर्घटनेत चालकाजवळील डब्याला मोठी हानी पोहोचली आहे.

मोनोची सेवा मुंबईत सुरू झाल्यापासून काहीना काही अडथळे येतच आहेत. ऑगस्टमध्ये एकाच दिवशी मोनोचे दोन अपघात झाले. त्यामुळे प्रशासनाने जुन्या मोनोगाड्यांची सेवा थांबवण्याचा निर्णय घेत ही सेवा काही दिवसांसाठी बंद ठेवली होती.

आता नवीन मोनोगाड्यांची चाचणी करण्यात येत आहे. सध्या पांढऱ्या रंगाच्या 10 नवीन गाड्या ताफ्यात आहेत. नवीन सीबीटीसी यंत्रणेवर या चालत असून त्याचीच चाचणी बुधवारी सुरू होती. वडाळा डेपो येथे चाचणी सुरू असताना मोनो रुळावरून घसरली. अपघातात पहिल्या डब्याच्या खालच्या भागाला हानी पोहोचली. यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

एमएमआरडीएच्या मते किरकोळ स्वरूपाची घटना

  1. एमएमआरडीएने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमएमओसीएल) मोनोरेलमध्ये नवीन सिग्नल प्रणाली, नवीन मोनो गाड्या आणि तंत्रज्ञान लागू करण्यासाठी काम हाती घेतले आहे. मोनोरेलच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यासाठी अत्याधुनिक कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) सिग्नलिंग प्रणालीची चाचणी सध्या सुरू आहे. या प्रणालीची अंमलबजावणी प्रकल्पाचे नियुक्त कंत्राटदार मेधा एसएमएच रेल प्रायव्हेट लिमिटेड करत आहेत.

  2. चाचण्यांदरम्यान बुधवारी सकाळी किरकोळ स्वरूपाची घटना घडली. परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आणली गेली असून कोणत्याही कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. त्या वेळी दोन तांत्रिक कर्मचारी, ज्यामध्ये मोनोरेल ऑपरेटरचाही समावेश होता. हे चाचणी प्रक्रियेत सहभागी होते. ही चाचणी संपूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात सुरक्षा नियमांचे पालन करून पार पाडण्यात आली.

  3. या चाचण्यांचा उद्देश तांत्रिकदृष्ट्या अत्यंत बिकट परिस्थितीत प्रणालीची प्रतिक्रिया तपासणे आणि प्रत्यक्ष वापरापूर्वी संपूर्ण तांत्रिक तयारीची खातरजमा करणे हा आहे. त्यामुळे अशा नियंत्रित परिस्थितीत अशा चाचण्या मानक चाचणी प्रक्रियेचा नियमित भाग आहेत.

  • 2460 कोटी रुपये खर्च करून आठ वर्षांपूर्वी मुंबईत सुरू झालेली मोनोरेल सेवा अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने तोट्यात सुरू आहे. असे असताना या सेवेला एमएमआरडीएकडून बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन मोनो सेवेत दाखल झाल्या आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT