Swimming Record 
मुंबई

Swimming Record | 8 वर्षांच्या ईवा पार्टेचा समुद्रात पराक्रम! अटल सेतू ते गेटवे 17 किमी अंतर 2 तास 52 मिनिटांत पार

Swimming Record | चिमुकलीचा मोठा पराक्रम; समुद्र जिंकण्याची जिद्द

पुढारी वृत्तसेवा

  • ८ वर्षांच्या ईवा पार्टेचा समुद्रात ऐतिहासिक पराक्रम

  • अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी अंतर पूर्ण

  • अवघ्या २ तास ५२ मिनिटांत आव्हान पूर्ण

  • रात्री ३ वाजता सुरू केले जलतरण

  • पुढील लक्ष्य ३६ किमी अंतर पार करण्याचे

डोंबिवली : अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकलीने जिद्द, मेहनत आणि धाडसाच्या जोरावर समुद्रालाही आव्हान दिले आहे. डोंबिवलीतील ईवा सान्वी दिनेश पार्टे हिने अरबी समुद्रात जलतरण करत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तिच्या या पराक्रमामुळे संपूर्ण परिसरात तिचे कौतुक होत आहे.

डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात राहणारी ईवा गेल्या तीन महिन्यांपासून जलतरणाचे विशेष प्रशिक्षण घेत होती. यश जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज सुमारे तीन तास सराव करत होती. तिच्या यशामागे प्रशिक्षकांसह कुटुंबीयांचीही मोठी साथ लाभली.

ईवाने पहाटे ३ वाजता अटल सेतू येथून समुद्रदेवतेची पूजा करून जलतरणाला सुरुवात केली. शरीराला ग्रीस लावून आणि महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या निरीक्षकांच्या देखरेखीखाली ती समुद्रात उतरली.

रात्रीचा अंधार, समुद्रातील जहाजांची हालचाल, उसळणाऱ्या लाटा, तसेच पाण्यातील प्रदूषण यांसारख्या अनेक अडचणींचा सामना करत ईवाने आपला प्रवास सुरू ठेवला. पोहताना प्लास्टिक, नारळ, कचरा यांसारख्या वस्तींमुळे तिला अडथळे आले, तरीही तिने हार मानली नाही.

अखेर तिच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि सकाळी ५ वाजून ५२ मिनिटांनी तिने गेटवे ऑफ इंडिया गाठले. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे १७ किलोमीटर अंतर तिने अवघ्या २ तास ५२ मिनिटांत पूर्ण केले.

मे महिन्यातील खडतर हवामानात समुद्रात पोहणे अत्यंत धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत ईवाने हा पराक्रम गाठल्याने तिच्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचल्यानंतर तिचे आई-वडील, प्रशिक्षक आणि नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.

ईवाचे पुढील लक्ष्य आता अधिक मोठे असून ती धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल ३६ किलोमीटर अंतर पार करण्याचा निर्धार केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT