अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणार्‍या मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.  File Photo
मुंबई

बार्टीच्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना

मातंग, मांग-गारूडी आदी समाजांच्या विकासाचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), या संस्थेच्या धर्तीवर आता अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणार्‍या मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाकडून मंगळवारी याबाबतचा शासन निर्णय जाहिर करण्यात आला. या संस्थेच्या स्थापनेमुळे अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) आदी समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती आदी योजना राबविल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे ‘आर्टी’ या संस्थेचा खर्च ‘बार्टी’ ला मंजूर असलेल्या निधीतून करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणार्‍या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाने शासनास 82 शिफारशी केल्या होत्या. आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी शिफारस करण्यात आलेली होती.

त्याचबरोबर 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती. पावसाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण (आर्टी) संस्थेच्या कार्यालयासाठी चिरागनगर, घाटकोपर येथे जागा देण्यात आली आहे. येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत या संस्थेला भाड्याची इमारत घेऊन कामकाज सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली सामाजिक समता या विषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

सामाजिक समता या विषयाशी निगडीत व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे, तसेच लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिध्दी करणे, परंपरागत व्यवसायांना चालना देणे, आर्थिक मदत करणे, आदी अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT