School Pudhari
मुंबई

English dominance in maharashtra : महाराष्ट्रात इंग्रजीचे वर्चस्व वाढले

मराठीच्या फक्त 2 हजार, तर इंग्रजीच्या 12 हजार 991 शाळा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : इंग्रजी शाळांच्या माध्यमांकडे पालकांचा वाढत असलेला ओढा पाहता राज्यात मराठी शाळेपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वर्चस्व वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

विधिमंडळात गुरुवारी सादर झालेल्या महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्रात स्वयंम अर्थसहाय्यित शाळांची संख्या 15 हजारांहून अधिक झाली असून यामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाच्या सुमारे 12 हजार 991 तर मराठी माध्यमाच्या फक्त 2010 शाळांचा समावेश आहे. दरम्यान, जानेवारी 2026 अखेर राज्यात 860 पीएमश्री शाळा असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

राज्य शासनाच्या अहवालातील आकडेवारीनुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये राज्यात एकूण 15,253 स्वयंपूर्ण शाळा कार्यरत होत्या, तर 2024-25 मध्ये ही संख्या 15,128 इतकी आहे. मंडळनिहाय पाहता 2023-24 मध्ये राज्य मंडळाच्या 13,655 शाळा, सीबीएसईच्या 1,204, राज्य मंडळ व सीबीएसई मिळून 15, तसेच आयसीएसई, आयजीसीएसई, आयबी आदी अन्य मंडळांच्या 379 शाळा होत्या.

2024-25 मध्ये राज्य मंडळाच्या 13,658, सीबीएसईच्या 1,260, राज्य मंडळ व सीबीएसईची 1, आणि अन्य मंडळांच्या 389 शाळांची नोंद झाली आहे. माध्यमानुसार पाहता इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते. 2023-24 मध्ये 12,986 शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या, तर मराठी माध्यमाच्या 2,035 आणि इतर भाषा माध्यमाच्या 232 शाळा होत्या.

2024-25 मध्येही हा कल कायम राहिला असून इंग्रजी माध्यमाच्या 12,991, मराठी माध्यमाच्या 2,010 आणि इतर भाषांतील 217 शाळा कार्यरत आहेत. राज्यात 38 अनुदानित सैनिक शाळा असून त्यापैकी चार शाळा केवळ मुलींसाठी आहेत. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या सैनिक शाळांमध्ये 11,915 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

राज्यात माध्यमिक (इयत्ता 9 वी ते 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 11 वी ते 12 वी) शिक्षण व्यवस्थेत गेल्या वर्षभरात काही महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. 30 सप्टेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार राज्यातील नोंदविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या 2023-24 मध्ये 28,986 होती, ती 2024-25 मध्ये वाढून 29,641 इतकी झाली आहे. ग्रामीण भागातील शाळांचे प्रमाण 58.2 टक्के इतके कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT