engineering admission Pudhari
मुंबई

Engineering admission 2025: अभियांत्रिकीच्या तीनऐवजी चार कॅप फेर्‍या, संस्था जागांसाठी शुल्क, असे झाले यंदा बदल?

Maharashtra CAP rules 2025: संस्थात्मक प्रवेश फेरीची यादीही गुणवत्तेच्या आधारावरच जाहीर केली जाणार

पुढारी वृत्तसेवा

Engineering CAP rounds in Maharashtra 2025

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता तीन ऐवजी चार केंद्रिभूत प्रवेश फेर्‍या (कॅप) होणार आहेत. तसेच पहिल्या, दुसर्‍या आणि तिसर्‍या फेरीत अनुक्रमे एक, तीन आणि सहा पसंतीक्रमांपैकी एक महाविद्यालय मिळाल्यास त्या विद्यार्थ्याचा अर्ज त्या महाविद्यालयासाठी लॉक होणार आहे. विशेष म्हणजे चार फेर्‍या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी होणार असून या फेरीची यादीही गुणवत्तेनुसारच जाहीर केली जाणार आहे. तसेच या फेरीसाठी संस्थेने अर्ज नाकारल्यास विद्यार्थी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज दाखल करता येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदल अधिसूचना काढत शुक्रवारी जाहीर केले आहेत. या बदललेल्या नियमांबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी सविस्तर माहिती दिली. अभियांत्रिकीच नाही, तर राज्यातील सर्वच विनाअनुदानित खासगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी हे नियम लागू होणार आहेत.

तीनऐवजी चार फेर्‍या

आता अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत तीनऐवजी चार कॅप फेर्‍या होतील. या चार फेर्‍या झाल्यावर कोणतीही सुधारणा फेरी (बेटरमेंट) होणार नाही. दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध जागा सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. तसेच दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांना विकल्प नमुना (ऑप्शन फॉर्म) भरण्याची किंवा मागील फेरीत भरलेल्या नमुन्यात बदल करण्याची संधी मिळेल.

असे झाले यंदा बदल?

पसंतीक्रमानुसार जागानिश्चिती: उमेदवारांनी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार पहिल्या यादीसाठी पहिली संस्था, दुसर्‍या यादीसाठी पहिल्या तीन संस्था आणि तिसर्‍या यादीसाठी पहिल्या सहा संस्था यापैकी एखाद्या संस्थेत जागा वाटप झाले, तर त्या संस्थेत त्याची जागा आपोआप गोठवली जाईल. अशा उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरवले जाणार नाही.

संस्था जागांसाठी शुल्क

संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांकडून संस्था नियोजित शुल्काच्या जास्तीत जास्त तीन पट शुल्क आकारणी करू शकतात. तर अनिवासी भारतीय कोट्यातून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा जास्तीत जास्त पाच पट एवढी असेल.

संस्थात्मक कोट्यातून प्रवेश

चारही कॅप फेर्‍यांची प्रक्रिया पार पडली आणि चौथ्या कॅप फेरीद्वारे अलॉटमेंट प्रक्रिया झाल्यावर त्यानंतर संस्थात्मक कोट्यातील जागांची यादी जाहीर होईल. विद्यार्थी या चारही फेर्‍यांदरम्यान या संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी अर्ज दाखल करू शकतील. समजा एखाद्या संस्थेने विद्यार्थ्याचा अर्ज दाखल करून घेतला नाही, तर असे विद्यार्थी सीईची कक्षाच्या संकेतस्थळावरून संस्थात्मक कोट्यासाठी अर्ज दाखल करू शकतील. असे अर्ज चार फेर्‍यांनंतर संबंधित संस्थेकडे पाठवले जाणार आहेत. संस्थेला या फेरीची निवडप्रक्रिया गुणवत्तेच्या आधारेच करावी लागणार आहे. तसेच संबंधित संस्थेला ही गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर करणे अनिवार्य असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT