

मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांमध्ये यंदा प्रवेशासाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. कारण, 90 ते 99.99 पर्सेन्टाइल मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 4 हजार 471 ने वाढली आहे. विशेषतः 100 पर्सेन्टाइल मिळवलेले 22 पैकी 14 राज्यातील आणि 4 राज्याबाहेरील असे 18 विद्यार्थी जेईई डव्हान्समध्येही यशस्वी ठरले असून त्यांचा कल आयआयटीकडे आहे. त्यामुळे राज्यातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागांसाठी या गटातील विद्यार्थ्यांमध्ये अधिक चुरस निर्माण होणार आहे.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांसाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) घेतलेल्या सीईटी परीक्षेत राज्यभरातून 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. या 22 पैकी तब्बल 18 जणांनी देशभरातील विविध आयआयटींसह इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई डव्हान्स परीक्षेतही यश मिळवले आहे. त्यामुळे हे विद्यार्थी राज्यातील अभियांत्रिकी संस्थांऐवजी आयआयटीला प्राधान्य दिले आहे.
मुंबईतील जुहू येथे राहणार्या अर्णव निगमने जेईई डव्हान्स परीक्षेत अखिल भारतीय 11 वा क्रमांक पटकावला. सीईटी परीक्षेत त्याला 100 पर्सेंटाइल मिळाले असले, तरी त्याला आयआयटी मुंबईत कम्प्युटर सायन्स शाखेसाठी प्रवेश मिळाला आहे. मीर विपुल भुवा या विद्यार्थ्यानेही जेईई डव्हान्समध्ये 69 वा क्रमांक देशपातळीवर मिळवला. आयआयटी दिल्लीमध्ये कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घेतला आहे. मुंबईचा गंधार वर्तक जेईई परीक्षेत संपूर्ण भारतातून 135 वा होता. त्याला इलेक्ट्रिकल शाखेसाठी आयआयटी-मुंबईत प्रवेश मिळाला आहे. असे टॉपर्स विद्यार्थी राज्यातील महाविद्यालय सोडून इतर ठिकाणी प्रवेश घेणार असल्याने 90 ते 99.99 पर्सेन्टाइल मिळवणार्या विद्यार्थ्यांत राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या टॉप अभ्यासक्रमांच्या जागा मिळवण्यासाठी राज्यातील महाविद्यालयात चुरस वाढेल अशी शक्यता आहे.
नांदेडच्या वैष्णवीला पुण्याच्या सीओईपीमधून कम्प्युटर सायन्स या शाखेतून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करायचे आहे.. नांदेडच्याच अनिल पाटील यालाही सीओईपीमध्ये कम्प्युटर सायन्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे. मुंबईतील आयुष दुबेला 100 पर्सेंटाइल मिळवले आहेत. आता त्याला मुंबईच्या व्हीजेटीआयमध्ये प्रवेश घेऊन कम्प्युटर सायन्स शाखेतून शिक्षण पूर्ण करायचे आहे. यामुळे आता राज्यातील टॉप महाविद्यालयातूनही प्रवेश घेण्याकडे अनेकांचा कल आहे. एमएचटी सीईटी देत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही दोन वर्षात वाढ झाली आहे.
70 ते 80 पर्सेंटाईल मिळवणार्या विद्यार्थ्यांची संख्या 5 हजार 718 ने अधिक आहे. तर 90-99.99 पर्सेंटाईल गटात यंदा 43 हजार 299 विद्यार्थी आहेत, तर मागील वर्षी हे प्रमाण 38 हजार 828 होते. म्हणजे 4 हजार 471 विद्यार्थ्यांनी अधिक गुण मिळवले.