मुंबई : मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंत्यांच्या बदली प्रकरणात करोडो रुपयाची उलाढाल होते. यात अतिरिक्त आयुक्त अमित सैनी सहभागी असल्याचे आरोपी करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत, राज्य सरकारने अवघ्या 20 महिन्यातच त्यांचे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पद काढून घेतले. विशेष म्हणजे सध्या त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
मुंबई महानगरपालिकेत अभियांत्रिकी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालत असल्याची चर्चा आहे. महापालिकेतील मलईदार खाते मिळवण्यासाठी कनिष्ठ अभियंता पासून मुख्य अभियंतापर्यंत चढाओढ लागलेली असते. यासाठी अभियंते लाखो रुपये देण्यासही तयार असतात. नगर अभियंता विभागामार्फत या बदल्या होत असल्या तरी, या खात्याची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त यांचीही अंतिम मंजुरी घेण्यात येते. अमित सैनी यांनी 20 मार्च 2024 मध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे नगर अभियंता विभागाची जबाबदारी आली. त्यामुळे अभियंत्यांच्या बदलीमध्ये सैनी कटाक्षाने लक्ष द्यायचे, असे बोलले जाते. बदलीची प्रत्येक फाईल त्यांच्याच सहीने मंजूर होत असे, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे सच्चा व अभ्यासू अभियंत्याला चांगले खाते मिळतच नव्हते.
लाखो रुपये देऊन मलईदार खाते मिळवणाऱ्या भ्रष्ट अभियंत्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराज अभियंत्यांनी थेट राज्याच्या नगर विकास विभागाकडे तक्रार केल्याचे समजते. याची गंभीर दखल घेत, राज्य सरकारने सैनी यांचे महापालिकेतील अतिरिक्त पद काढून घेत त्या ठिकाणी सनदी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची नियुक्ती केली.
अविनाश ढाकणे यांनी पदभार स्वीकारला
मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी शुक्रवार सकाळी अमित सैनी यांच्याकडून आपला पदभार स्वीकारला. यावेळी उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांनी अविनाश ढाकणे यांचे स्वागत केले. ढाकणे यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात 1994 मध्ये नाशिक येथे उप जिल्हाधिकारी म्हणून झाली. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील 2010 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. गेल्या 31 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्र शासनाच्या वित्त व उद्योग मंत्रालयात अतिरिक्त खासगी सचिव, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, जळगाव जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या पदांची जबाबदारी पार पाडली.