मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी भाजपासह शिवसेना, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसने दिवाळीतच प्रचाराचा नारळ फोडला आहे. दिवाळी पहाट, आकाश कंदील व उटणे पॉकेट व अन्य भेटवस्तूंच्या माध्यमातून सर्वच पक्ष मुंबईकरांच्या घराघरांत पोहोचले आहेत.
मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक तब्बल चार वर्षांनंतर होणार आहे. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसह शिवसेना (ठाकरे गट) काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या महाविकास आघाडीने महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार पाहणाऱ्या मुंबई महापालिकेवर आपलाच महापौर बसावा यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
दिवाळी असा एक सण आहे की, प्रत्येक राजकीय पक्षाला भेटवस्तूंच्या माध्यमातून घराघरांत पोहचता येते. त्यामुळे यावेळी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येक पक्षाच्या त्या त्या प्रभागातील इच्छुकांनी नरक चतुर्दशी दिवशी होणाऱ्या अभ्यंगस्नानाच्या पूर्वी प्रत्येक घरात उटण्याच्या पॉकेटचे वाटप करण्यात आले. या पॉकेटवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या फोटोसह पक्षाचे नाव, पक्ष चिन्ह व इच्छुकाचा फोटो छापण्यात आला होता.
उटण्यासह काही प्रभागांमध्ये इच्छुकांनी लहान मोठ्या भेटवस्तूंचेही वाटप केले. एवढेच नाही तर विभागा-विभागांमध्ये दिवाळी पहाट या हिंदी-मराठी गीतांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. नाक्यानाक्यावर विविध पक्षांचे आकाशकंदीलही लावण्यात आले होते.
प्रचाराचा पहिला टप्पा
निवडणूक घोषित झाल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन भेटणे शक्य नसते. विशेष म्हणजे मतदाराला आचारसंहितेतील नियमांमुळे भेटवस्तूही देता येत नाही. त्यामुळे दिवाळीमध्ये भेटवस्तूच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचणे शक्य होते. त्यामुळे आमच्यासाठी हा प्रचाराचा पहिलाच टप्पा असल्याचे मत सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी व्यक्त केले.