मुंबई : 65 ते 85 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये हाडांच्या फ्रॅक्चरच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती अस्थिरोग तज्ज्ञांनी दिली आहे. दर आठवड्याला 10 ते 15 वृद्ध रुग्णांना गंभीर फ्रॅक्चरमुळे शस्त्रक्रियेची गरज भासत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही फ्रॅक्चर केवळ किरकोळ स्वरूपाची न राहता अनेकदा एकापेक्षा जास्त हाडे मोडणे, सांध्यांचे नुकसान, इम्प्लांटच्या आसपास फ्रॅक्चर आणि जखमा उशिरा भरणे अशा गुंतागुंतीच्या स्वरूपात आढळून येत आहेत.
वेळीच निदान व योग्य वैद्यकीय व्यवस्थापन केल्यास वृद्धांमधील दीर्घकालीन अपंगत्व, अंथरुणाला खिळून राहणे तसेच दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहण्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.
ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. धिरज सोनावणे यांनी सांगितले की, ऑस्टियोपोरोसिस, व्हिटॅमिन डीची कमतरता, मधुमेह, संधिवात, शरीराचा तोल जाणे आणि दृष्टीदोष यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. बैठी जीवनशैली, कुपोषण, पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे आणि हाडांच्या आरोग्याची नियमित तपासणी न करणे ही देखील प्रमुख कारणे आहेत. अगदी किरकोळ धक्क्यानेही वृद्धांमध्ये गंभीर फ्रॅक्चर होऊ शकत असल्याचे डॉ. परवेझ शेख यांनी सांगितले.
वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अनुप खत्री यांनी सांगितले की, फ्रॅक्चर टाळण्यासाठी नियमित बोन डेन्सिटी आणि व्हिटॅमिन डी तपासणी, कॅल्शियम व प्रथिनयुक्त आहार, पुरेसा सूर्यप्रकाश, योग्य पादत्राणे, घरात सपोर्ट रेलिंग, डोळ्यांची तपासणी आणि संतुलन वाढवणारे व्यायाम आवश्यक आहेत. वेळीच वैद्यकीय तपासणी केल्यास ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय व स्वावलंबी जीवनशैली जगता येते.