Opertaion Tiger Pudhari
मुंबई

Opertaion Tiger: एकनाथ शिंदे - पाटील भेटीने ‌‘ऑपरेशन टायगर‌’ची चर्चा

संजय पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाल्याने शिंदे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांची भेट घेतल्याने आणि पाटील हे शिंदेंच्या कारमध्ये बसल्याचे दिसल्याने पुन्हा ऑपरेशन टायगरच्या चर्चेला फोडणी मिळाली. मात्र, संजय पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाल्याने शिंदे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले.

संजय दिना पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा अलीकडेच अपघात झाला आहे. त्या रुग्णालयात आहेत. हे समजताच एकनाथ शिंदे हे मंगळवारी पल्लवी पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात गेले होते.

केवळ स्वत:च्याच पक्षातील नव्हे तर दुसऱ्या पक्षातील नेत्यांचीही अडचणीच्या काळात विचारपूस करतात.हाच अनुभव संजय दिना पाटील यांना आला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंचे खासदार फुटीच्या उंबरट्यावर असल्याच्या बातम्या जोर धरत असल्याने ही भेट चर्चेची ठरली. राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‌’ऑपरेशन टायगर‌’ची कुजबूज सुरु झाली.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे काही खासदार कोणालाही सुगावा लागू न देता एकनाथ शिंदे यांना भेटल्याची चर्चा रंगली. गेल्या महिन्यात ही गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील - आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित असल्याचे सांगितले गेले.

तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदार व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते, अशी चर्चा होती. आता संजय पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीने शिळ्या कढीला उत आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT